मनपा कर्मचाऱ्यांवरील राजकीय हस्तक्षेप थांबवा

मनपा कर्मचाऱ्यांवरील राजकीय हस्तक्षेप थांबवा

मनपा कामगार सुरक्षा विकास संघटनेचे आयुक्तांना निवेदन
बेळगाव : बेकायदेशीर कामे करण्यासाठी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काही राजकीय व्यक्ती दबाव घालत आहेत. त्यामुळे काम करणे अवघड झाले आहे. तेव्हा हा राजकीय दबाव कमी करण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी महानगरपालिका कामगार सुरक्षा विकास संघटनेतर्फे मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही महिन्यापासून राजकीय व्यक्ती बेकायदेशीर कामासाठी दबाव घालत आहेत. काम केले नाही तर तुमची इतरत्र बदली करू किंवा कामावरुन कमी करू, अशी धमकी देखील ते देत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या राजकीय दबावामुळे मनपातील कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत. तेव्हा त्याकडे गांभीर्याने लक्ष देवून राजकीय हस्तक्षेप थांबवा, अशी मागणी करण्यात आली. मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मलिक गुंडप्पण्णावर, उपाध्यक्ष भरत तळवार, यल्लेश बच्चलपुरी, श्रीकांत इरली, एल. बी. दयान्नावर, सुशांत हावण्णावर, एम. बी. दोडमनी, अमित यलकार, ए. डी. देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.