जलसंपदा विभागाच्या जागेत होर्डिंगरूपी यमराज..!

जलसंपदा विभागाच्या जागेत होर्डिंगरूपी यमराज..!

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागापासून खडकवासला धरण ते उरुळी कांचनपर्यंत खडकवासला जलसंपदा (पाटबंधारे) विभागाच्या जागेत अनेक वर्षांपासून उभे असलेले सर्व बेकायदेशीर होर्डिंग हटविण्याचा आदेश न्यायालयाने देऊनही अनेक महिन्यांपासून होर्डिंग मुख्य सिंहगड रस्ता, पानशेत रस्ता, मुठा कालव्यासह दाट लोकवस्ती, प्रचंड वाहतूक कोंडी होणार्‍या चौकात अजूनही बिनदिक्कतपणे उभे आहेत. सर्वांत गंभीर स्थिती सिंहगड रस्त्यावर आहे. खडकवासला धरणापासून नांदेड फाटा, किरकटवाडी, धायरी, वडगाव, राजाराम पूल, पर्वतीपर्यंत मुठा कालव्यावर धोकादायक होर्डिंग उभे आहेत.
नांदेड, धायरी फाटा आदी ठिकाणी होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्यानंतरही पुन्हा त्या ठिकाणी होर्डिंग उभे राहिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जलसंपदा विभागाच्या जागेतील होर्डिंग काढण्यात यावेत, असे पत्र खडकवासला जलसंपदा विभागाने पालिकेला दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. जलसंपदा विभागाच्या जागेत बेकायदा होर्डिंग उभे करणार्‍या होर्डिंग व्यावसायिकांविरोधात जलसंपदा विभागाने न्यायालयात धाव घेतली होती.
फलक निघेनात!
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, जलसंपदा विभागाच्या मालकी जागेत खडकवासला धरणापासून ते उरुळी कांचनपर्यंत असलेले बेकायदा होर्डिंग हटविण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आठ-नऊ महिन्यांपूर्वी याप्रकरणी होर्डिंग्ज व्यावसायिकांविरोधात न्यायालयाने निकाल दिला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाला संबंधित होर्डिंग्ज हटविण्याचे पत्रही त्या वेळी दिले आहे. अद्यापही होर्डिंग उभे असल्याने पुन्हा एकदा पत्र दिले जाणार आहे.
होर्डिंग हटविण्यासाठी पथके सज्ज
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप खलाटे म्हणाले की, न्यायालयाने आदेश दिल्यानंतर जलसंपदा विभागाच्या जागेतील चार मोठे बेकायदा होर्डिंग हटविण्यात आले आहेत. राजाराम पुलाजवळील होर्डिंगचे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे त्यावर कारवाई करता येत आहे. जलसंपदासह शासकीय तसेच खासगी मालकी जागेतील होर्डिंगची तपासणी सुरू केली आहे. बेकायदेशीर होर्डिंग हटविण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत.
तपासणी करण्याच्या सूचना
जलसंपदा विभागाच्या मुठा कालव्यासह मोक्याच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून बेकायदा होर्डिंग उभे आहेत. मुंबई होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विशेषतः वर्दळीच्या सिंहगड, एनडीए, कात्रज आदी रस्त्यावरील होर्डिंगची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
हेही वाचा

पीएमपी-चारचाकीचालकाचा रस्त्यातच ‘राडा’; फर्ग्युसन रस्त्यावरील घटना
Nashik | कांदाप्रश्नी पंतप्रधान मोदींना भुजबळांचे साकडे
Peregrine Falcon : रॉकेटच्या वेगाने शिकार करणारा पक्षी