सरस्वतीनगरातील गटारींना झाडाझुडपांचा विळखा

सरस्वतीनगरातील गटारींना झाडाझुडपांचा विळखा

स्वच्छतेसाठी जिल्हा पंचायतीला निवेदन
बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या सरस्वतीनगरमधील गटारी, नाले आणि इतर पडीक जमिनीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे माती आणि झाडाझुडपांचा विळखा पडला आहे. याबाबत ग्राम पंचायत सचिवांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. मात्र, दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने गटारी आणि परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते शिवाजी पाटील यांनी जिल्हा पंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. सरस्वतीनगर येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्राम पंचायतीला 11 जानेवारी रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र, ग्राम पंचायतीने अद्याप स्वच्छतेचे काम हाती घेतलेले नाही. जेसीबीच्या कामामुळे काही ठिकाणी गटारी आणि रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर गटारींमध्ये माती, कचरा साचून राहिल्याने पाण्याचा निचरा थांबला आहे. तर काही ठिकाणी झाडेझुडपांनी गटारी झाकून गेल्या आहेत. तातडीने ग्राम पंचायतीने स्वच्छतेचे काम हाती घ्यावे, अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.