श्रवणीय ‘गीतरामायण’ने रसिक तृप्त

श्रवणीय ‘गीतरामायण’ने रसिक तृप्त

लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी आयोजित ‘गीतरामायण’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : गायन मंचच्या गायकांकडून निवडक गीते सादर
बेळगाव : गदिमांच्या शब्दवैभवाने व सुधीर फडके म्हणजेच बाबूजींच्या स्वरलालीत्याने नटलेल्या गीतरामायणाचे गारुड रसिक मनावर आजही कायम आहे. याचेच प्रत्यंतर रसिकांना बुधवारी आले. अयोध्या येथे श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीने आयोजित केलेल्या ‘गीतरामायण’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गायन मंचच्या गायकांनी या कार्यक्रमांतर्गत  गीतरामायणातील निवडक गीते अत्यंत प्रभावीपणे सादर करून श्रोत्यांना स्वरानंद दिला. अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लोकमान्य सोसायटीतर्फे गीतरामायण कार्यक्रम आयोजित केला होता. सांगलीच्या स्वरवैभवच्या गायकांनी गीत रामायणातील निवडक गीते सादर केली. गायकांच्या सुरेल व तितक्याच श्रवणीय गीतांना वादकांनी साथ केली. त्याचबरोबर नेटके व तितकेच अनुरूप निवेदन केल्याने या कार्यक्रमाने रसिकांची वाहवा मिळविली.
या कार्यक्रमात सुकृत यांनी ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’, ‘शरयू तिरावरी’, ‘चला राघवा’ व ‘दैवजात दु:खे भरता’ ही गीते सादर केली. श्रीरंग यांनी ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला’, ‘नकोस नौके’, ‘माता न तू वैरिणी’ ही गीते सादर केली. कीर्ती यांनी ‘राम जन्मला’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘निरोप कसला माझा घेता?’, ‘कोण तू कुठला राजकुमार’, ‘तोडिता फुले मी’ ही गीते सादर केली. त्याचबरोबर ‘धन्य मी शबरी’, ‘लिलया उडुनी गगनात’, ‘सेतू बांधारे’, ‘अनुपमेय हो’, ‘देव हो बघा रामलिला’, ‘त्रिवार जयजयकार’, ‘प्रभो मज’ व ’रघुराजाच्या नगरी जाऊन’ अशी अप्रतिम गीते सादर केली. शशांक लिमये यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. अजय भोगले यांनी तालवादन केले. परेश पेठे यांनी तबला, भास्कर पेठे यांनी हार्मोनियम, कृष्णा साठे यांनी बासरी तर अविनाश इनामदार यांनी की-बोर्डवर साथ दिली. बेळगावच्या बालचमूंचा यामध्ये सहभाग होता. श्रीशा रागे, ओजश्री इंगळे, सिद्धांत देसूरकर, ईशान मुतकेकर, श्रीराज इंगळे यांनी नृत्य सादर केले. लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर, रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील, संतोष कृष्णाचे, हेमगिरी युनिफॉर्मचे संचालक हेमेंद्र पोरवाल, किरण एअरकॉनचे कार्यकारी संचालक किरण इनामदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. हेमगिरी युनिफॉर्म, अभिजित देसाई कन्स्ट्रक्शन, किरण एअरकॉन व ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ यांच्या सहकार्यातून कार्यक्रम पार पडला.