अरिहंत हॉस्पिटल-रोटरी क्लबच्या भागीदारीतून ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ उपक्रम

अरिहंत हॉस्पिटल-रोटरी क्लबच्या भागीदारीतून ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ उपक्रम

मुलांमधील जन्मजात हृदयविकाराच्या उपचारांसाठी महत्त्वपूर्ण योजना
बेळगाव : अरिहंत हॉस्पिटलचे प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी स्थापन केलेले एक अग्रगण्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्यासोबत मुलांमधील जन्मजात हृदयविकार (सी.एच.डी.) या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. 33 वर्षांहून अधिक अनुभव असलेले डॉ. एम. डी. दीक्षित यांनी 35,000 हून अधिक ओपन हार्ट सर्जरी आणि 10,000 बालरोग शस्त्रक्रिया केल्या आहेत. सी.एच.डी. हा एक व्यापक आजार आहे जो भारतातील अनेक मुलांना प्रभावित करतो. 1000 मुलांमध्ये 8 ते 10 मुले या विकारासह जन्माला येतात. या लहान जीवांना सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्यांची एकमेव आशा म्हणजे या विकाराचा सामना करून यशस्वी शस्त्रक्रिया होणे. यापैकी 90 ते 95 टक्के प्रकरणे शस्त्रक्रियेद्वारे पूर्ण बरी होऊ शकतात. मात्र, यातील अनेक मुले विशेष रुग्णालयांमध्ये मिळणारा मर्यादित प्रवेश आणि त्यांच्या कुटुंबातील आर्थिक अडचणींच्या चक्रात सापडलेली दिसतात.
या संकटातून मार्ग काढण्यासाठी अरिहंत हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांनी एकत्र येऊन ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ हा उपक्रम सुरू केला आहे. रोटरी क्लबने पुढाकार घेतलेली गिफ्ट ऑफ लाइफ योजना, मुलांमधील जन्मजात हृदयविकाराच्या उपचारांसाठी महत्त्वपूर्ण योगदान आणि निधी प्रदान करते. या जीवरक्षक शस्त्रक्रियांशी संबंधित महागडा खर्च भागविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या असंख्य कुटुंबांसाठी हा आशेचा किरण आहे. अरिहंत हॉस्पिटलचे डॉ. एम. डी. दीक्षित यांनी या भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त केला असून आमचे ध्येय नेहमी गरजूंना उच्च दर्जाची आरोग्यसेवा पुरविणे हे आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या सहकार्याने आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष म्हणाले की, मुलांमध्ये सीएचडीचा सामना करण्यासाठी आमच्या प्रयत्नांमध्ये अरिहंत हॉस्पिटल सामील होताना आम्हाला आनंद होत आहे. भागीदारीने आम्ही या मुलांना एक नवीन आयाम आणि आशा देऊ शकतो. एकत्रितपणे, आपण महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो आणि हे सुनिश्चित करू शकतो की प्रत्येक मुलाला निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगण्याची ही एक संधी आहे, असे सांगितले. याप्रसंगी डॉ. महादेव दीक्षित, मनोज मायकल, जयदीप सिद्दनवार, डॉ. माधुरी दीक्षित, सुनिश मेत्राणी, डॉ. संतोष पाटील आणि योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.