अबब…मिरजेत लाचखोर अभियंत्याच्या लॉकरमध्ये सापडले पावणेदोन कोटीचे घबाड

अबब…मिरजेत लाचखोर अभियंत्याच्या लॉकरमध्ये सापडले पावणेदोन कोटीचे घबाड

माजलगाव पाटबंधारे अभियंत्याचे मिरजेतील लॉकर उघडल्यानंतर प्रकार उघडकीस : बीड लाचलुचपत आणि सांगली लाचलुचपत विभागाकडून संयुक्त कारवाई

सांगली प्रतिनिधी

माजलगाव पाटबंधारे विभागातंर्गत परळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांनी पाच शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतात माती टाकण्यासाठी 28 हजाराची लाच घेतली होती. त्या लाचेबाबत सलगरकर यांच्यावर 22 मे रोजी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या घराच्या झडतीमध्ये मिरजेतील युनियन बँकेचे लॉकर असल्याची माहिती समोर आल्यावर बीड आणि सांगलीच्या लाचलुचपत विभागाने संयुक्तपणे हे लॉकर उघडल्यावर या लॉकरमध्ये दोन किलो 15 ग्रॅम सोने त्याची किंमत एक कोटी 50 लाख 89 हजार आणि रोख रक्कम 11 लाख 89 हजार रूपये आढळून आले असे एकूण एक कोटी 61 लाख 89 हजाराचे घबाड सापडले आहे. त्याची जप्ती करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव पाटबंधारे विभागातंर्गत परळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर हे मिरजेतील जी-फोर, भाग्यश्री अपार्टमेंट सन्मान हॉटेलच्या मागे कुपवाड रोड, मिशन हॉस्पिटल एरिया मिरज येथे रहातात. 22 मे रोजी त्यांच्याकडे मौजे चिंचोटी येथील तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्यासाठी पाच शेतकऱ्यांनी परवानगी मागितली होती. ही परवानगी देण्यासाठी सलगरकर यांनी या शेतकऱ्यांकडून 28 हजाराची लाच मागितली होती. याची तक्रार या शेतकऱ्यांनी बीड येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सलगरकर याच्यावर 22 मे रोजी कारवाई केली होती.
या कारवाईनंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली त्यामध्ये मिरजेतील त्याच्या घराची झडती घेतल्यावर त्यात मिरजेतील युनियन बँकेत त्यांचे लॉकर असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी हे लॉकर शुक्रवारी उघडण्यात आले आणि त्यामध्ये दीड कोटीचे सोन्याची बिस्किटे, दागिने असा ऐवज आणि रोख 12 लाख रूपये आढळून आले आहेत. ही कारवाई बीड येथील पोलीस निरिक्षक युनुस शेख आणि सांगलीचे लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.