रॉयल चॅलेंजर्सचा आज लखनौ सुपर जायंट्सशी मुकाबला

रॉयल चॅलेंजर्सचा आज लखनौ सुपर जायंट्सशी मुकाबला

आयपीएलमधील आज मंगळवारी होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरची गाठ लखनौ सुपर जायंट्सशी पडणार असून सातत्याचा अभाव सतावणारा रॉयल चॅलेंजर्स संघ ही परिस्थिती बदलण्यास उत्सुक असेल. दुसरीकडे लखनौचे लक्ष त्यांचा नियमित कर्णधार के. एल. राहुलच्या तंदुरुस्तीवर असेल. रॉयल चॅलेंजर्स सध्या तीन सामन्यांतून दोन गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत आणि गेल्या आठवड्यात कोलकाता नाइट रायडर्सविऊद्ध झालेल्या दाऊण पराभवानंतर त्यांची निव्वळ धावसरासरीही उणे 0.71 वर घसरली आहे.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाला कमी लेखता येणार नाही. पण सातत्यपूर्ण कामगिरी करण्याच्या बाबतीत त्यांची क्षमता हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. खुद्द डू प्लेसिसला सध्या धडपडावे लागत आहे. आरसीबीच्या फलंदाजीत फक्त विराट कोहली सातत्यपूर्ण राहिला असून त्याने तीन सामन्यांतून दोन अर्धशतके झळकावली आहेत. पण आघाडीच्या व मधल्या फळीतील डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार आणि कॅमेरॉन ग्रीन हे चमक दाखवू शकलेले नाहीत. त्यामुळे आरसीबीला अनेकदा दिनेश कार्तिक आणि तळाकडील अनुज रावत आणि महिपाल लोमरोरवर अवलंबून राहावे लागले आहे. त्यामुळे आरसीबी पाटीदारला ब्रेक देऊन सुयश प्रभुदेसाईसारख्या फलंदाजाला खेळवू शकते.
आरसीबीच्या गोलंदाजीचीही अशीच स्थिती असून मोहम्मद सिराजला तीन सामन्यांतून  फक्त दोन बळी घेता आले आहेत आणि त्याने षटकामागे 10 या प्रमाणात धावा दिलेल्या आहेत. सिराजला आवश्यक यश न मिळाल्याने आरसीबीला सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये बळी मिळविता आलेले नाहीत. सिराजचा नवीन चेंडूवरील सहकारी अल्झारी जोसेफला तर एकच बळी मिळविता आला आहे त्याने आणि प्रति षटक 9.4 या सरासरीने धावा दिल्या आहेत. त्यामुळे, जोसेफच्या जागी ते रीस टोपले किंवा लॉकी फर्ग्युसन यापैकी एकाचा समावेश करण्याबाबत विचार करू शकतात. आरबीसीच्या फिरकी माऱ्याचीही स्थिती वेगळी नाही. ग्लेन मॅक्सवेल, कर्ण शर्मा आणि मयंक डागर यापैकी कोणीही मागील तीनपैकी कोणत्याही सामन्यात चार षटकांचा पूर्ण कोटा टाकलेला नाही.
दुसरीकडे, सुपर जायंट्सना त्यांचा नियमित कर्णधार राहुलच्या तंदुरुस्तीची चिंता सतावत आहे. पंजाब किंग्जवर विजय मिळविलेल्या सामन्यात राहुल इम्पेक्ट प्लेयर म्हणून उतरला होता. तसेच ते कायम राहून निकोलस पूरन कर्णधाराची भूमिका बजावेल की, कर्णधार, फलंदाज आणि यष्टिरक्षक या तिन्ही भूमिकांत राहुल परत येईल हे आज पाहावे लागणार आहे. लखनौतर्फे मयंक यादव या वेगवान गोलंदाजाचा झालेला उदय दिलासादायक आहे. पण चिन्नास्वामीवर त्याची कसोटी लागेल.
संघ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युद्धवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौतम, शिवम मावी, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, मॅट हेन्री, मोहम्मद अर्शद खान.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.