अमेरिकेची डॅनियली कॉलिन्स विजेती

अमेरिकेची डॅनियली कॉलिन्स विजेती

वृत्तसंस्था/ मियामी
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या मियामी खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या डॅनिली कॉलिन्सने सिडेड खेळाडू एलेना रायबाकिनाचा सरळ सेट्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात कॉलिन्सने रायबाकिनाचा 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. कॉलिन्सच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील हे सर्वात मोठे विजेतेपद आहे. डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या स्पर्धेतील कॉलिन्सचे हे पहिले अजिंक्यपद आहे. तसेच तिने डब्ल्यूटीए टूरवर आतापर्यंत एकूण 3 स्पर्धा जिंकल्या आहेत. 2021 साली कॉलिन्सने पाठोपाठ 2 स्पर्धा जिंकल्या होत्या. मियामी टेनिस स्पर्धा जिंकणारी कॉलिन्स ही अमेरिकेची सहावी महिला टेनिसपटू आहे. यापूर्वी म्हणजे अमेरिकेच्या मार्टीना नवरातिलोव्हाने 1985 साली, ख्रिस एव्हर्टने 1986 साली, व्हिनस विल्यम्सने 1998, 1999, 2001 साली, सेरेना विल्यम्सने 2002, 2003, 2004, 2007, 2008, 2013, 2014 आणि 2015 साली तसेच स्लोनी स्टिफेन्सने 2018 साली हि स्पर्धा जिंकली होती.