रामभक्त असून रामायणातील विचार मोदींनी स्वीकारले नाहीत; सामनाच्या रोखठोक मधून संजय राऊतांची मोदींवर टिका

रामभक्त असून रामायणातील विचार मोदींनी स्वीकारले नाहीत; सामनाच्या रोखठोक मधून संजय राऊतांची मोदींवर टिका

मुंबई प्रतिनिधी

भाजपाने राजकारणातील सभ्यता, संस्कृती गुंडाळून ठेवली असून त्याचा अनुभव निवडणूक प्रचारात आला. मोदी ’रामभक्त‘ आहेत. त्यांनी रामाचे मंदिर उभे केले, पण रामायण‚ महाभारताचा विचार स्वीकारला नसल्याचं थेट आरोप ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. राऊत पुढे म्हणाले की, सत्तेवरील व्यक्ती अध:पतित होऊन भ्रष्ट झाल्या आहेत. सज्जनांचा उपदेश त्यांच्या कानावरून जाऊ लागल्यावर त्यांच्या स़ाऱ्या कुळाचा, देशाचा नाश होतो आणि मग ते पदभ्रष्ट होतात आणि जगात त्यांची अपकीर्ती होते. भाजपा आणि मोदी यांच्या बाबतीत तेच घडले असल्याची टिका सामनाच्या रोखठोक मधून खा. संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या छोट्या पक्षांच्या कुबड्या घेऊन सरकार स्थापलं तरीही यां पक्षांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. मात्र त्यांच्यातील व्यवहाराची मोठी किंमत संपूर्ण देशाला चुकवावी लागणार आहे. मोदी तसेच भाजपाच्या राजकारणात ’नैतिकता‘ राहिली नसून लोकशाहीने कायमचे डोळे मिटावेत अशा या घटना सध्या दिल्लीत घडत आहेत. महाराष्ट्रात जसे घडले तसेंच चिराग पासवान यांच्या सोबत घडले असून त्यांचा लोकजनशक्ती पक्ष फोडून त्यांच्या काकांना देण्यात आला. त्यांचे ही चिन्ह, पक्ष काढून घेण्यात आले. तेच पासवान दिल्लीत मोदी सरकार सोबत असल्याची टिका करण्यात आली आहे. तसेच चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी ’एनडीए‘चे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, अशी गर्जना अमित शहा यांनी आंध्र प्रदेशात जाऊन केली होती. नायडू हे फसवणारे, शब्द न पाळणारे गफहस्थ असल्याचे अमित शहा यांचे बोलणे होते, तर 2019 साली नायडू यांनी मोदी यांना ’लोकशाहीचे मारेकरी‘ म्हटले.
मोदी हे अत्यंत पद्धतशीररीत्या देशाच्या घटनात्मक संस्था मोडीत काढीत असल्याची टिका यात करण्यात आली आहे. मोदी यांच्या हुकूमशाही कचाट्यातून सीबीआय, रिझर्व्ह बँक आणि घटनात्मक संस्था, निवडणूक आयोगही सुटलेला नाही असे नायडू यांचे जाहीर बोल होते. मोदी‚शहा यांचा निवडणूक आयोग ईव्हीएमचा घपला करून निवडणुका जिंकत असल्याचा त्यांचा आरोप खळबळजनक होता. आता तेच चंद्राबाबू हे मोदी‚शहांचे सरकार बनावे यासाठी पुढाकार घेत असल्याची टिका केली आहे. शिवाय पासवान यांच्या बाबत सांगताना प्रसंग देण्यात आला आहे. रामविलास पासवान हे अनेक वर्षे एनडीएबरोबर राहिले. त्यांचे अकाली निधन झाले. आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून पासवान यांचा मुलगा चिराग दिल्लीतील जनपथावरील निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सीपीडब्ल्यूडी विभागाने निर्घृणपणे पासवान यांच्या बंगल्यातील सर्व सामान बाहेर काढून अक्षरश: फेकले होते. त्यात रामविलास यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली. चिराग यांनी बंगला आणखी काही काळ राहावा म्हणून भाजपाच्या अनेक मंत्र्यांना फोन केले. नड्डाही त्यात होते, पण त्यांचा फोन घेण्याचे सौजन्य कोणी दाखवले नसल्याची आठवण यां प्रसंगातून दिली आहे.