मी १०० टक्के येणार पण…मी पंतप्रधानांना ओळखतो ते येणार नाहीत ! पब्लिक डिबेटसाठी राहूल गांधींचा मोदींना टोला

मी १०० टक्के येणार पण…मी पंतप्रधानांना ओळखतो ते येणार नाहीत ! पब्लिक डिबेटसाठी राहूल गांधींचा मोदींना टोला

पब्लिक डिबेट म्हणजेच सार्वजनिक सभेसाठी काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी होकार दर्शविला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यासाठी तयार होणार नाहीत मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो असं डिवचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिले आहे.
देशातील एका जेष्ठ पत्रकाराने आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माजी दोन न्यायाधिशांनी काँग्रेस नेते राहूल गांधी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांसमोर देशाच्या विकासासाठीच्या चर्चेसाठी एकत्र येण्याची विनंती केली आहे. या संदर्भातील पत्र सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यावर माध्यमांमध्ये एकच चर्चा रंगली.
लखनऊमध्ये ‘राष्ट्रीय संविधान संमेलन’ या कार्यक्रमामध्ये संबोधित करताना राहुल गांधी यांना एका पत्रकाराने याविषयी छेडले. या सार्वजनिक वादविवादासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण चर्चेला तयार आहात काय असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना राहूल गांधी यांनी, “मी कोणत्याही व्यासपीठावर सार्वजनिक समस्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करण्यास 100% तयार आहे,” असे म्हणून “पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच ओळखतो…तो माझ्याबरोबर वादविवाद करण्यास १०० तयार होणार नाही.” असा टोलाही हाणला.
‘द हिंदू’ वृत्तपत्राचे माजी संपादक एन. राम, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती ए .पी. शाह यांनी गुरुवारी दोन्ही नेत्यांना गैर- व्यावसायिक आणि पक्षविरहित व्यासपीठावर जाहीर चर्चेसाठी भाग घेण्याचे आवाहन केले. तसेच आजच्या डिजिटल युगात चुकीची माहिती भरपूर आहे मात्र अशा प्रकारच्या वादविवादामुळे मतदानाद्वारे योग्य आणि सक्षम नेता निवडण्यास उपयोगी ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.