8 हजार जनावरांना रेबीज प्रतिबंधक लस

8 हजार जनावरांना रेबीज प्रतिबंधक लस

जिल्ह्यात कुत्र्यांचे हल्ले वाढले : पशुसंगोपन खाते खडबडून जागे, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
बेळगाव : शहरात मागील 15 ते 20 दिवसांत 25 हून अधिक जणांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे पशुसंगोपन खाते खडबडून जागे झाले आहे. मागील महिन्याभरात 8 हजार जनावरांना अॅन्टीरेबिज प्रतिबंधक लसीकरण देण्यात आले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने रेबीजचा धोका निर्माण झाला आहे. किणये येथील युवक रेबीजने मृत्युमुखी पडला होता. त्यानंतर शहरात दोनवेळा कुत्र्यांचे हल्ले झाले आहेत. विशेषत: यामध्ये लहान बालके टार्गेट बनली आहेत. त्यामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. पशुसंगोपन खात्यामार्फत रेबीजबाबत जनजागृतीचे कामही हाती घेण्यात आले आहे. मात्र काही श्वान पालकांकडूनच याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. त्यामुळे काही श्वान रेबीज प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहू लागले आहेत आणि यातूनच जीवघेण्या रेबीजचा धोका वाढू लागला आहे. शहरात वाढलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. कुत्र्यांबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांना लस टोचली जात आहे. विशेषत: कुत्र्यांना प्राधान्य दिले जात आहे. पाळीव कुत्र्यांना लसीकरण होत असले तरी भटकी कुत्री मात्र वंचित राहू लागली आहेत. या कुत्र्यांकडूनच हल्ले होत आहेत आणि रेबीजचा धोकाही निर्माण होऊ लागला आहे. शहरात 5 हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. ही कुत्री रेबीज प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहू लागली आहेत. मनपा प्रशासनाकडून केवळ तात्पुरते निर्बिजीकरणाची प्रक्रिया राबविली जाते. त्यानंतर भटक्या कुत्र्यांचे कळप शहरात वावरताना कायम दिसत आहेत.
मोहीम अधिक तीव्र
पशुसंगोपन खात्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील कुत्र्यांबरोबर जनावरांनाही प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली आहे. जनावरांना रेबीजपासून दूर ठेवण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविण्यात आली आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यातून ही लस टोचली जात आहे.