प्रियांका जारकीहोळी ‘चिकोडी’तून विजयी

प्रियांका जारकीहोळी ‘चिकोडी’तून विजयी

 प्रियांका यांना 90,834 मताधिक्य : कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी
चिकोडी : चिकोडी लोकसभा निवडणूक दुरंगीच झाली. भाजपकडून आण्णासाहेब जोल्ले तर काँग्रेसच्यावतीने जारकीहोळी कुटुंबातून प्रियांका यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नवख्या उमेदवाराच्या जोरावर काँग्रेसने निवडणूक लढविली. त्यातही आण्णासाहेब जोल्ले यांना टक्कर देताना जारकीहोळी कुटुंबाने आपले सर्वस्व पणाला लावताना निवडणूक लढवली. गत लोकसभा निवडणुकीत प्रकाश हुक्केरी यांच्या ताब्यात असणारा काँग्रेसचा बाल्लेकिल्ला आण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्या ताब्यात घेतला. अशा परिस्थितीत अटीतटीने झालेली 2024 ची लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर प्रियांका जारकीहोळी यांच्या बाजूने जनतेने कौल देताना चक्क 90,834 मत्ताधिक्याने विजयाची माळ त्यांच्या गळ्यात घालताना पुन्हा चिकोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा ‘हात’ बळकट केला.
मंगळवारी पहाटे 5 वाजल्यापासूनच निवडणूक मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी व अधिकाऱ्यांची वर्दळ सुरू होती. सकाळी 8 वाजता सुरू झालेले पोस्टल मतदान, प्रारंभी संथ गतीने झालेली मतमोजणी, सकाळी 9 नंतर काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी घेतलेली मताधिक्याची उसळी अन् हे मताधिक्य कमी होईल, अशी भाजप कार्यकर्त्यांना लागलेली धाकधूक असे चित्र होते. काँग्रेस व दुसरीकडे आशेचा किरण वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या अपेक्षा अशा वातावरणात लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर प्रियांका जारकीहोळी यांच्या मताधिक्याने अधोरेखित झाला.
एकूण 13 लाख 93 हजार 093 मतदान झाले होते. एकूण 9600 पोस्टल बॅलेटपैकी त्यातील चक्क 2232 पोस्टल बॅलेट बाद ठरविण्यात आले. तर 7368 बॅलेट ग्राह्य धरण्यात आले. पहिल्या फेरीपासून सतत प्रियांका यांना मताधिक्य मिळत होते. केवळ 17 व्या फेरीत जोल्ले यांना 2 हजार अधिक मताधिक्य मिळाले होते. अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळीकर अधिक मते घेतील ही अपेक्षा फोल ठरली. त्यांना केवळ 25466 मते मिळाली. चिकोडी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे चिकोडी येथील आर. डी. कॉलेजच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली होती. सकाळी सात वाजता विविध पक्षांचे प्रतिनिधी, निवडणूक निरीक्षक, निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंगरूम खोलण्यात आले. प्रारंभी पोस्टल मतमोजणी करण्यात आली. पण त्या मतमोजणीची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही. नंतरच्या टप्प्यात मतदान यंत्रातील मतमोजणी सुरू झाली.
सकाळी 8.30 नंतर पहिल्या व इतर फेऱ्यांचे निकाल येऊ लागले होते. प्रारंभीपासूनच काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी यांनी घेतलेले मताधिक्य पुढे दर फेरीत वाढतच गेले. प्रारंभी 2500, नंतर 7 हजार, नंतर 20 ते 25 हजार असे मताधिक्य अनेक फेरीत दिसून आहे. नंतर 30 हजारावर व पुढे दर फेरीत हे मताधिक्य वाढत गेले. अखेरच्या टप्प्यात लाखाच्या आसपास पोहोचलेले प्रियांका यांचे मताधिक्य थोडेफार घटत येऊन ते 92 हजारांवर येऊन स्थिरावले. आर. डी. प्रवेशद्वारावरच पासधारकांची तपासणी करून त्यांना मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येत होता. चिकोडी शहर व परिसराला पोलीस बंदोबस्ताने वेढा घातला होता. तरीही शहरातील वाहतुकीमध्ये सातत्याने कोंडी निर्माण होत होती. निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. त्याची प्रचिती आज त्यांच्या कामातून दिसून आली. सकाळी दहापासून प्रत्येक फेऱ्यांचे निकाल सातत्याने जाहीर करण्यात येत होते.
दुपारी 2 ते 2.30 या दरम्यान निवडणुकीचा पूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता असतानाही अखेरच्या 22 व्या फेरीतील मतदान केंद्रातील अथणी विधानसभा मतदारसंघातील एका बुथमधील मतदान समाविष्ट करताना काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणीची अंतिम आकडेवारी स्पष्ट झालेली नव्हती. शिवाय पोस्टल मतदानाचे स्कॅनिंग करण्यात येणार असल्याने व ही मते सुमारे 7000 वर असल्याने त्या प्रक्रियेसाठीही विलंब लागला. मतमोजणीच्या 15 व्या फेरीतच प्रियांका जारकीहोळी विजयी झाल्याचे जवळपास निश्चित झाले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दुपारी 2.30 च्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह चिकोडी शहर व परिसरातील मलिकवाड, एकसंबा, नणदी, हिरेकोडी परिसराला पावसाने झोडपून काढले. शहरातील आर. डी. हायस्कूलच्या प्रवेशद्वारा जवळूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे नागरिकांना व कार्यकर्त्यांना ये-जा करणे अडचणीचे होत होते. मुसळधार पावसाने जल्लोष करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे चित्र दिसत होते. सायंकाळी चारनंतर आर. डी. महाविद्यालय परिसर निर्जन झाला. केवळ पोलीस अधिकारी व निवडणूक मतमोजणी कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू होती.
अर्धी मोजणी झाल्यानंतरच कार्यकर्ते गुलालात
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा विजय होताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. चिकोडी येथील आर. डी. महाविद्यालयाच्या मैदानासमोरील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राजवळ काँग्रेस कार्यकर्ते दुपारी बेभान होऊन जल्लोष करत होते. अर्धी मोजणी पूर्ण होताच कार्यकर्ते जल्लोष करत होते. काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांचा मुलगा राहुल जारकीहोळीही यावेळी कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर शांत व वर्दळ नसलेले रस्ते हळूहळू काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरून गेले होते. हजारो काँग्रेस नेते व कार्यकर्ते चिकोडीत दाखल झाले होते. दुपारी पाऊस आला तरी युवा कार्यकर्त्यांचा जल्लोष कमी झालेला नव्हता. शहरात  कार्यकर्ते जल्लोष करत होते. आर. डी. मैदानाजवळील विजयी मिरवणुकीत हजारो युवक व नागरिक सहभागी झाले होते.
विजय चिकोडीच्या जनतेसाठी समर्पित
लोकसभा निवडणुकीत माझा झालेला विजय चिकोडीच्या जनतेला समर्पित करते, असे नवनिर्वाचित लोकसभा सदस्या प्रियांका जारकीहोळी यांनी म्हटले आहे. प्रियांका यांनी गोकाक येथे आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, लोकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक काम करून चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहीन. हा विजय मी लोकसभेच्या जनतेला समर्पित करत आहे. चिकोडी मतदारसंघातील सर्व मतदार, कार्यकर्ते, नेते, पक्षातील सर्व ज्येष्ठ व इतर नेते, आमदार यांच्या मेहनतीमुळे आज मी अभूतपूर्व विजय मिळवला आहे. त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छिते. राज्य सरकारच्या गॅरंटी योजना व वडील मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विकासकामांचा माझ्या विजयात मोलाचा वाटा आहे.
पराभव झाला तरी लोकांच्या सेवेत राहणार
निवडणुकीत जय-पराजय आलाच. पण, माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलेल्या चिकोडी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा मी ऋणी आहे. पराभव झाला म्हणून मी लोकांपासून दूर जाणारा नाही. निरंतरपणे लोकांच्या सेवेत कायम राहणार आहे, असे मत पराभूत उमेदवार आण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक जाहीर झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत निरंतरपणे काम केलेल्या कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, मतदार यांचा मी सदैव ऋणी आहे. यापुढेही लोकांच्या सेवेत कमी पडणार नाही. पराभव झाला म्हणून कुठेही न थांबता लोकांच्यासाठी सेवेत राहणार आहे.