पणजीत 1 एप्रिलपासून ई-कदंब बसगाड्या

पणजीत 1 एप्रिलपासून ई-कदंब बसगाड्या

प्र्रवाशांच्या सोयीसाठी मिळणार दोन योजना : मिरामार, दोनापावला, गोवा विद्यापीठपर्यंत
पणजी : येत्या सोमवार दि. 1 एप्रिलपासून राजधानी पणजीत कदंब परिवहन महामंडळातर्फे ई-कदंब बसेस सुऊ करण्याची तयारी पूर्ण झाली असून त्यात एक मार्ग प्रवास व परत (रिटर्न) त्याच दिवसासाठी आणि मासिक पास अशा दोन योजनांचा लाभही प्रवाशांना देण्याचा प्रयत्न कदंबने केला आहे.  ‘स्मार्ट सिटी’ मिशन योजनेअंतर्गत ही सेवा सुऊ होणार असून त्याचे भाडे किमान ऊ. 10 व कमाल ऊ. 20 असे निश्चित करण्यात आले आहे. त्या बसगाड्यांसाठी विविध मार्गावर मिळून 161 बस थांबे अधिसूचित करण्यात आले आहेत. ही बससेवा टप्प्या टप्प्याने वाढवण्यात येणार असून मिरामार, दोनापावला, गोवा विद्यापीठ, इत्यादी भागात प्रथम सेवा देण्यात येणार आहे. या ई-बसगाड्यांचे रंग वेगवेगळे देण्यात आले असून बसथांबेही त्याच रंगात उपलब्ध करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हा बेत आखण्यात आला होता परंतू खासगी बसमालक, चालकांचा विरोध आणि इतर काही कारणांमुळे त्याची कार्यवाही होत नव्हती तसेच ती प्रलंबित राहून पुढे-पुढे जात होती. शेवटी कदंब महामंडळाने येत्या 1 एप्रिलपासून ‘स्मार्ट सिटी’ बससेवा कार्यान्वित करण्याचे पक्के ठरविले आहे. वाहतूक खाते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पणजी, ताळगाव परिसरातील खासगी बसचालक-मालकांना इतर पर्याय देण्यात आले असून शाळेसाठी किंवा पर्यटनासाठी त्यांच्या बसगाड्यांचा वापर करण्यात यावा, असे सूचित केले आहे. ते शक्य नसेल तर ‘म्हजी बस’ या योजनेअतंर्गत कदंबच्या ताफ्यात सामिल व्हावे असा पर्यायदेखील देण्यात आला आहे. राजधानी पणजीत व सभोवताली प्रवासी वाहतूक करण्याऱ्या खासगी बसगाड्या 20 ते 30 वर्षाच्या जुन्या आहेत. शिवाय त्या खिळखिळ्या झालेल्या असून कायदा-नियमानुसार प्रवासी वाहतूक करण्याची योग्यता त्या बसगाड्यांची संपलेली आहे. जवळपास 90 टक्के बसगाड्या खुपच जुन्या असल्याचे सुत्रांनी सांगितले.