जांबोटीनजीकच्या वसतिगृहाची आमदारांकडून पाहणी

जांबोटीनजीकच्या वसतिगृहाची आमदारांकडून पाहणी

वसतिगृहाची उद्घाटनापूर्वीच दुरवस्था : अधिकाऱ्यांना क्रम घेण्याच्या सूचना
खानापूर : येथील जांबोटी क्रॉसजवळ असलेल्या शासकीय महाविद्यालयानजीक काही वर्षापूर्वी पदवीपूर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या वसतिगृहाची उद्घाटनापूर्वीच दुरवस्था झाली आहे. या वसतिगृहाची आमदार विठ्ठल हलगेकर यांनी अचानक पाहणी करून शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या व संबंधित खात्याचे अधिकारी, ता. पं. अधिकारी, रामगुरवाडी पीडीओ व गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत तातडीने क्रम घेण्याच्या सूचना केल्या. तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय व्हावी, यासाठी गेल्या पाच-सहा वर्षापूर्वी वसतिगृह बांधले आहे. मात्र या वसतिगृहाचे उद्घाटनच अद्याप झाले नाही. वसतिगृहाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली असून, दरवाजे मोडले आहेत. खिडक्यांची तावदाणे फुटली आहेत. संपूर्ण इमारतीची दुरवस्था झाली आहे.
इमारतीत विटा, मातीसह अन्य कचरा साचलेला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन इमारतीत काही गैरप्रकारही होत आहेत. शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करून इमारत बांधली आहे. पण वसतिगृहाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांची सोय केलेली नाही. मागीलवर्षी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यानी दोनवेळा आंदोलन करून सदर वसतिगृह सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी विद्यार्थ्यांची बोळवण करून पाठविले होते. अद्यापही याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. गुरुवारी दुपारी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या वसतिगृहाची पाहणी करून शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप जवळकर, गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची तसेच इतर अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने योग्य निर्णय घेण्याची सूचना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केली आहे.