‘हे’ 100 फुटी ‘चालणारे झाड’ आहे जंगलाची शेवटची खूण

‘हे’ 100 फुटी ‘चालणारे झाड’ आहे जंगलाची शेवटची खूण

वेलिंग्टन : न्यूझीलंडमध्ये एक शंभर फूट उंचीचे अनोखे झाड आहे. त्याची रचना पाहून अनेक लोक त्याला ‘वॉकिंग ट्री’ किंवा ‘चालणारे झाड’ असे म्हणतात. ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मधील एंटची आठवण यावी, असे हे झाड खरे तर तेथील एके काळी असलेल्या जंगलाची शेवटची खूण आहे. या झाडाला आता ‘न्यूझीलंडस् ट्री ऑफ द इअर’चा सन्मान मिळाला आहे!
या झाडाचे खोड मानवाच्या दोन पायांसारखे विभागलेले आहे. त्यामुळे ते जणू काही चालत असावे, असे वाटते. या झाडाचे नाव ‘नॉर्दन राटा’ किंवा वैज्ञानिक भाषेत ‘मेट्रोसायडेरोस रोबुस्टा’ असे आहे. एके काळी अशा उंच झाडांचे जंगलच न्यूझीलंडमध्ये होते, जे एक हजार वर्षे अस्तित्वात होते. मोठ्या हातांसारख्या त्याच्या फांद्यामुळे त्याला ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मधील वृक्षासारख्या दिसणार्‍या व जंगलांचे रक्षण करणार्‍या काल्पनिक पात्रासारखे बनवतात.
साऊथ आयर्लंडच्या पश्चिम किनार्‍याजवळ असलेल्या कॅरामियातील दफनभूमीसमोर हे झाड उभे आहे. ते 105 फूट उंचीचे आहे. एखाद्या सात मजली इमारतीइतक्या उंच असलेल्या या झाडाकडे अनेक लोक कुतूहलाने पाहत असतात. न्यूझीलंड आर्बोरिकल्चरल असोसिएशनच्या ‘ट्री ऑफ द इअर 2024’ पुरस्काराने हे झाड गौरवण्यात आले आहे.