नीट’ विद्यार्थ्यांसाठी उच्चाधिकार समिती

नीट’ विद्यार्थ्यांसाठी उच्चाधिकार समिती

1,600 विद्यार्थ्यांच्या अडचणींची चौकशी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली 
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या ‘नीट’ परीक्षेसंदर्भात उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) घेतला आहे. या परीक्षेला बसलेल्या 1,600 विद्यार्थ्यांच्या काही अडचणी आहेत. या अडचणींची चौकशी ही समिती करणार असून त्यावर तोडगा काढणार आहे. ही नीट परीक्षा यावेळी मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
4 जूनला नीट-युजी परीक्षेचा परिणाम घोषित करण्यात आला होता. पण या परीक्षेला बसलेल्या अनेक परीक्षार्थींनी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी ही परीक्षा रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. बिहारमध्ये नीटची प्रश्नपत्रिका फुटणे, काही परीक्षार्थींना गुप्तपणे ग्रेसमार्क दिले जाणे, अनेक विद्यर्थ्यांना आश्चर्यकारकरित्या खूप जास्त गुण मिळणे, तसेच अनपेक्षितरित्या अनेक परीक्षार्थींना पैकीच्या पैकी गुण मिळणे, असे अनेक गैरप्रकार या परीक्षेत झाल्याचा आरोप अनेक परीक्षार्थींनी केला आहे. त्यांचे आरोप हे मोठ्या वादाचे कारण बनलेले आहे. त्यामुळे चौकशी समिती स्थापन होणार आहे.
सिंग यांची पत्रकारपरिषद
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुबोध कुमार सिंग यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन येथे केले होते. या परिषदेत त्यांनी काही बाबींवर प्रकाश टाकला. प्रश्नप्रत्रिका फुटल्याच्या आरोपाचा त्यांनी स्पष्ट इन्कार केला. कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. परीक्षेचा प्रारंभ झाल्यानंतर दोन तासांनी प्रश्नप्रत्रिका सोशल मिडियावर काही जणांकडून पोस्ट करण्यात आली होती. त्यामुळे प्रश्नप्रत्रिका फुटल्याचा आरोप धादांत खोटा असून हेतुपुरस्सर करण्यात आला आहे. परीक्षा अत्यंत प्रामाणिकपणाने घेण्यात आली, असे प्रतिपादन त्यांनी केले.
होता एका प्रश्नाचाच प्रश्न
यावेळी प्रश्नपत्रिकेसंबंधी केवळ एका प्रश्नाचाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे 1,563 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्यात आल्या होत्या. त्यांच्यापैकी 790 विद्यार्थी पुढच्या फेरीसाठी पात्र ठरले. एकंदर 13 लाखांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले आहेत, त्यांच्यामुळे अन्य कोणत्याही विद्यार्थ्याच्या भवितव्यावर विपरीत परिणाम झालेला नाही. तसेच एकंदर गुणांच्या टक्केवारीवरही या ग्रेस मार्कांचा परिणाम झालेला नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. तरीही सरकारने समिती स्थापन केली असून विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर विचार केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. उच्चाधिकार समितीची स्थापना लवकरच केली जाणार असून तिची कार्यकक्षाही त्वरित ठरविली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे प्राधिकारणाचे धोरण आहे, असेही सुबोध कुमार सिंग यांनी स्पष्ट केले.
वाद का निर्माण झाला ?
यावर्षी नीट परीक्षेला 23 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. फिजिक्स या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाला 13,373 परीक्षार्थींनी आव्हान दिले होते. एनसीईआरटीच्या जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमातील फरकामुळे ही अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तरासाठी एका पर्यायाच्या स्थानी दोन पर्याय ग्राह्या धरले जावेत, असा तोडगा तज्ञांनी सुचविला होता. त्याला अनुसरुन काही परीक्षार्थींना ग्रेस गुण देण्यात आले होते. पण त्यामुळे वाद निर्माण झाला होता. या वादावर उच्चाधिकार समिती तोडगा काढणार आहे, अशी माहिती आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य
ड विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे प्राधिकरणाचे धोरण
ड ग्रेस मार्क देण्याचे कारण प्राधिकारणाच्या प्रमुखांनी केले आहे स्पष्ट
ड विद्यार्थ्यांच्या अडचणींचा आणि शंकांचा विचार करणार हे प्राधिकरण
ड नीट परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन