मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा

मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा

वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणात भाजपकडून आरोप
बेंगळूर : महर्षि वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणी आरोप झाल्याने क्रीडा-युवजन सेवा आणि अनुसूचित जमाती कल्याण खात्याचे मंत्री बी. नागेंद्र यांनी गुरुवारी राजीनामा दिला आहे. स्वेच्छेने मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे एक ओळीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडे सादर केले. बेंगळूरमधील मुख्यमंत्र्यांचे गृहकार्यालय कृष्णा येथे सिद्धरामय्यांची भेट घेत बी. नागेंद्र यांनी राजीनामापत्र सादर केले. याप्रसंगी मंत्री जमीर अहमद खान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित होते. राजीनामा देण्यापूर्वी नागेंद्र यांनी मी निरपराधी असून दबावाला बळी न पडता स्वेच्छेने राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
राजीनाम्यासाठी दबाव नाही
विरोधी पक्ष काँग्रेसवर चिखलफेक करत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माझ्यावर राजीनाम्यासाठी कोणताही दबाव आणलेला नाही. मात्र, पक्षाची वा सरकारची कोंडी होऊ नये, यासाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होत आहे. तपास होत असताना मी मंत्रिपदावर राहिल्यास समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्महत्या केलेल्या वाल्मिकी विकास निगमचे अधिकारी चंद्रशेखरन यांनी सुसाईड नोटमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केलेला नाही. एसआयटीच्या तपासातून सत्य बाहेर येईल. त्यानंतर मी पुन्हा मंत्री बनेन, असे बी. नागेंद्र यांनी सांगितले.
भाजपकडून राज्यपालांना निवेदन
मागील आठवड्यात कर्नाटक महर्षि वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास निगमचे अधीक्षक पी. चंद्रशेखरन यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत निगममध्ये अनुदानाचा दुरुपयोग झाला आहे. मंत्र्यांच्या तोंडी आदेशानुसार हा गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख केला होता. या प्रकरणी भाजपने मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करून 6 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. राजीनामा न दिल्यास ‘राजभवन चलो’ची हाक दिली होती.  गुरुवारी भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन नागेंद्र यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
राजीनामा मागितलेला नाही!
आम्ही नागेंद्र यांच्याकडे राजीनामा मागितलेला नाही. सरकारची कोंडी होऊ नये यासाठी त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. कोणत्याही मंत्र्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर रकमेचा दुरुपयोग करण्याचे धाडस होत नाही. हे काम तितके सोपे नाही. याविषयी आम्ही नागेंद्र यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सीबीआय चौकशा करण्यासही आक्षेप नसल्याचे सांगितले आहे.
– डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री