दिग्गज कंपन्यांची विदेशातील महत्त्वाच्या खनिजांवर नजर

दिग्गज कंपन्यांची विदेशातील महत्त्वाच्या खनिजांवर नजर

खाण सचिव व्हीएल कांता राव यांनी उत्खनन करण्याचे दिले निर्देश : चिली, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांवर लक्ष
वृत्तसंस्था /नवी दिल्ली 
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख कंपन्या जशा की कोल इंडिया, एनएमडीसी, ओएनजीसी यांना खनिज संपत्तीने समृद्ध देशांमध्ये महत्त्वाच्या खनिजांचे उत्खनन करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय खाण मंत्रालय अदानी एंटरप्रायझेस, टाटा ग्रुप, हिंडाल्को इत्यादी खासगी कंपन्यांना चिली, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांतील महत्त्वाच्या खनिजांच्या खाणकामात गुंतवणूक करण्यासाठी सुविधा पुरवते आहे अशी माहिती खाण सचिव व्हीएल कांता राव यांनी दिली आहे. लिथियम, तांबे आणि कोबाल्ट यांसारख्या देशाच्या ऊर्जेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या खनिजांची मजबूत पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून हा प्रयत्न केला जात आहे. राज्य कंपनी कोल इंडिया चिलीमध्ये लिथियम ब्लॉक्स घेण्याचा सक्रिय प्रयत्न करत आहे.  एनएमडीसीकडे ऑस्ट्रेलियात सोन्याच्या खाणी असून ऑस्ट्रेलियात लिथियम खाणींवर त्यांची नजर आहे, असेही सचिव व्हीएल कांता राव यांनी स्पष्ट केले.
‘ओएनजीसी’ला खनिज उत्खनन निर्देश
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची विदेशात उपस्थिती आहे. नवी दिल्लीतील एका उद्योग परिषदेच्यावेळी राव म्हणाले, ‘आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना विदेशातील महत्त्वाच्या खनिजांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि हा एक सोपा मार्गही आहे. विदेशातही त्यांची उपस्थिती आहे. टाटा, वेदांत आणि लोहम सारख्या कंपन्यांनी झांबियाच्या प्रतिनिधी मंडळाचा भाग होण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. हिंडाल्को आणि अदानी हे देखील चिलीला नुकत्याच झालेल्या शिष्टमंडळाचा भाग होते आणि या भारतीय शिष्टमंडळाने तेथे लिथियम आणि तांबे या क्षेत्रातील संधी शोधल्या. याखेरीज एक वेगळे शिष्टमंडळ कांगोला पाठवले जाईल असेही सचिवांनी सांगितले आहे.