शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

पंचवटी : Bharat Live News Media वृत्तसेवा
होळी सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. २५) सायंकाळी रामकुंड परिसरात ‘वीरांची’ वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांसह युवकांनी केलेल्या विविध प्रकारच्या वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
होळी सण साजरा केल्यानंतर धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा आहे. घरोघरी देव्हाऱ्यात असलेले वीरांचे टाक खोबऱ्याच्या वाटीत ठेवून व लाल कापडात बांधून याची मिरवणूक काढली जाते. याप्रमाणे सायंकाळी लहान मुले व युवक विविधरंगी वेशभूषा करून रामकुंडाच्या दिशेने वाजत गाजत येत होते. रस्त्याने लागणाऱ्या होळीभोवती पाच प्रदक्षिणा करून नंतर रामकुंड परिसरातील होळीभोवती प्रदक्षिणा मारून रामकुंडात देवाला स्नान घालून व त्याचे विधिवत पूजन करून हे नागरिक माघारी फिरत होते. यानंतर घरोघरी तळी भरून ‘बोल विरोबा की जय’ अशा घोषणा देत खोबऱ्याचा प्रसादवाटप केला जात होता.
यावेळी येथील वातावरणात चैतन्य निर्माण होऊन, अबालवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदी भाव उमटले असल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्ताने रामकुंडावर विविध खेळण्यांची छोटी मोठी दुकाने थाटली होती. पंचवटी विभागात असलेले नांदूर गाव, मानूर, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, हिरावाडी यासह शहरातील अनेक भागांतून वीरांच्या मिरवणूक काढण्यात आल्या.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात वीरांचा नाच
रामकुंडावर पारंपरिक वाद्याच्या गजरात हाती घेतलेले हे वीर विशिष्ट प्रकारचा नाच करीत होळीभोवती फेर धरत होते. भगवान शंकर, श्रीराम, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे अशा विविध प्रकारच्या वेशभूषा करण्यात आल्या होत्या. यासह डोक्यात फेटा, टोपी घालून व गळ्यात फुलांचे हार घालण्यात आले होते.
 
नाशिक : वीरांची पूजा करताना महिला.
नाशिक : धुलिवंदननिमित्त परंपरेप्रमाणे यंदाही शहरासह परिसरातील विविध वीरांची भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आल्याने ही मिरवणूक पाहण्यासाठी गोदाघाटावी झालेली भाविकांची अलोट गर्दी.
नाशिक : धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम राखत बालरुपातील वीर नाचवितांना नागरिक. (सर्व छायाचित्रे : हेमंत घाेरपडे)
हेही वाचा:

धक्कादायक! ९ वर्षीय मुलाचे अपहरण; २३ लाखांची मागणी आणि खून
कामाची थट्टा ! ठेकेदाराचा प्रताप; पुलाच्या कामात काँक्रीटऐवजी माती
Onion Export Ban | कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी; उन्हाळ कांद्याचेही निघाले दिवाळे

Latest Marathi News शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम Brought to You By : Bharat Live News Media.