इव्हीएम मशीन्स स्ट्राँगरूमकडे रवाना

इव्हीएम मशीन्स स्ट्राँगरूमकडे रवाना

निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात : पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया
बेळगाव : जिल्हा निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार इव्हीएम मशीन विधानसभा मतक्षेत्रातील संबंधित तालुक्याच्या स्ट्राँगरूमकडे पाठविण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून इव्हीएम मशीन संबंधित ठिकाणी पाठविल्या जात आहेत. मंगळवारी हिंडलगा येथील भारतीय निवडणूक आयोगाच्या गोदामातून इव्हीएम मशीन स्ट्राँगरूमकडे पाठविण्यात आल्या. निवडणुकीसाठी तालुक्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्ट्राँगरूमकडे संबंधित इव्हीएम मशीन पाठविण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मंगळवारी रात्री पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया करण्यात आली. यावेळी 18 विधानसभा मतदारसंघातील साहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांसह चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी उपस्थित होते.