Breaking : मुंबईमध्ये धुळीचे वादळ…होर्डिंग कोसळून ३ ठार, कित्येक लोक अडकले; बचावकार्य सुरू

Breaking : मुंबईमध्ये धुळीचे वादळ…होर्डिंग कोसळून ३ ठार, कित्येक लोक अडकले; बचावकार्य सुरू

राजधानी मुंबई (Mumbai) पावसाच्या तडाख्यात सापडली असून विविध ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. शहरातील घाटकोपर, वडाळा, भायखळा परिसरात जोरदार पावसामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपाववर महाकाय होर्डींग कोसळले. या अपघातामध्ये ३ लोकांचा मृत्यु झाला असून ५९ लोकांना बाहेर काढण्यात बचाव कार्याला यश आले आहे. तर अजून तब्बल 70 ते 80 चारचाकी गाड्या यामध्ये अडकल्या असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
जखमींचा आकडा वाढत असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (NDRF) सह हे बचावकार्य सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासन हाय अलर्टवर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत प्रशासनाला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईच्या काही भागांमध्ये, विजांच्या कडकडाटासह आणि मध्यम पावसासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. जोरदार वाऱ्यांमुळे दादरसह आसपासच्या परिसरामध्ये धुळीच्या वादळ निर्माण होऊन अंधुक वातावरणाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईच्या पूर्व आणि उत्तर भागात जवळपास पाऊणतास मुसळधार पाऊस पडला.
सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाणे आणि पालघरच्या आसपासच्या भागांना पावसाने झोडपून काढले. यामध्ये ठाणे, पालघर तसेच मुंबईची पूर्व उपनगरे मुलुंड, टिटवाळा आणि कल्याण हा परिसर सर्वाधिक प्रभावित झाला आहे.
मुंबईमधील वडाळाच्या पूर्वेला धुळीच्या वादळामुळे तसेच सोसाट्याच्या वादळासह मुसळधार पावसामुळे एका इमारतीवरील होर्डिंग्ज कोसळले. यामध्ये किमान सात जण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भातील व्हिडीयो व्हायरल झाला आहे.