क्रिकेट वर्ल्ड कप : भारत सेमी फायनलमध्ये ‘या’ टीमशी खेळणार, कुणाला संधी तर कुणाचा पत्ता कट?
आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 मधील सेमी फायनलच्या 4 टीम आणि दोन्ही लढतीचं चित्रं आता स्पष्ट झालंय. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिली तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी सेमी फायनल होईल.
चारही संघांची यापूर्वीची कामगिरी काहीही असली तरी आता त्यांना वर्ल्ड कप जिंकण्याची समान संधी आहे. एक विजय त्यांना फायनलमध्ये तर एक चूक स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणार आहे. त्यामुळे सेमी फायनलच्या लढती चारही संघांसाठी ‘करो वा मरो’ स्वरुपाच्या असतील.
पहिली सेमी फायनल – भारत विरुद्ध न्यूझीलंड
दिनांक – बुधवार, 15 नोव्हेंबर
ठिकाण – वानखेडे स्टेडियम, मुंबई
भारत 4 वर्षांपूर्वीचा वचपा काढणार?
विश्वचषक स्पर्धेपूर्वी यजमान भारताला अनेक तज्ज्ञांनी विजेतेपदाची पहिली पसंती दिली होती. भारतीय टीमनं त्यांच्या अपक्षेनुसार खेळ करत पहिला क्रमांक पटकावत सेमी फायनल गाठली आहे.
2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं सेमी फायनलमध्ये पराभव करत टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेर काढलं होतं. चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी भारताला आहे. पण, ते तितकं सोपं नाही.
विराट – रोहितची मोठी परीक्षा
फलंदाजी हे भारतीय टीमचं प्रत्येक स्पर्धेतील बलस्थान असतं. ही स्पर्धाही त्याला अपवाद नाही. टॉप सहामधील सर्वच फलंदाजांनी उपयुक्त कामगिरी केल्यानं भारताला हार्दिक पंड्याची कमतरता भासलेली नाही.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीवर भारतीय फलंदाजीची भिस्त आहे. रोहित सलग तिसरी तर विराट सलग चौथी वन-डे विश्वचषकाची सेमी फायनल खेळणार आहे.
विराटनं यापूर्वीच्या 3 सेमी फायनलमध्ये 3.66 च्या सरासरीनं फक्त 11 रन केले आहेत. त्याला सेमी फायनलमध्ये अद्याप एकही चौकार लगावता आलेला नाही. विराटचा सध्याचा फॉर्म पाहाता तो हा खराब रेकॉर्ड तो यंदा नक्की मोडण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माचीही सेमी फायनलमधील कामगिरी साधारण आहे. त्यानं 2 सामन्यात 17.5 च्या सरासरीनं 35 धावा केल्यात. टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले हे दोघं कसं खेळतात त्यावर भारताच्या यशाचं गणित अवलंबून असेल.
जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाजाचं त्रिकूट चांगलंच फॉर्मात आहे. शमीनं न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
वानखेडेच्या पिचवर संध्याकाळी स्विंग गोलंदाजांना चांगलीच मदत मिळत असल्याचं या स्पर्धेत दिसलंय. त्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजांना रोखण्यासाठी न्यूझीलंडला खास रणनीती आखावी लागेल.
कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा हे धोकादाय स्पिनर टीम इंडियाकडे आहेत. मधल्या ओव्हर्समध्ये जमलेली जोडी फोडण्याच्या त्यांच्या कौशल्य सेमी फायनलमध्ये महत्त्वाचं ठरेल.
न्यूझीलंड हॅट्ट्रिक करणार?
2015 आणि 2019 मध्ये विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या न्यूझीलंडला यंदा हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे.
न्यूझीलंडनं या स्पर्धेत सलग 4 विजय मिळवून दमदार सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी सलग 4 सामने गमावले. त्यामध्ये भारताविरुद्धच्या पराभवाचाही समावेश होता.
न्यूझीलंडची फलंदाजी या स्पर्धेत चांगलीच फॉर्मात आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 383 आणि पाकिस्तानविरुद्ध 401 धावा केल्या होत्या. तर इंग्लडविरुद्ध 283 धावांचं आव्हान 36.2 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं होतं.
राचिन सचिनला मागं टाकणार?
राचिन रविंद्रनं या स्पर्धेत आत्तापर्यंत 70.62 च्या सरासरीनं 565 धावा केल्यात. एकाच विश्वचषकात सर्वाधिक 673 धावांचा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याला आणखी 109 धावांची गरज आहे.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात झळकावलेल्या शतकानंतर डेव्हॉन कॉनवेनं मोठी खेळी केलीली नाही. पण, टीमला वेगवान सुरूवात करून दिलीय. भारतीय पिचवर खेळण्याचा चांगला अनुभव असलेल्या कॉनवेला कमी लेखून चालणार नाही.
डॅरिल मिचेलनं 9 मॅचमध्ये 418 धावा केल्यात. त्यामध्ये भारताविरुद्ध झळकावलेल्या शतकाचा समावेश आहे. कर्णधार केन विल्यमसन दुखापतीनंतर परतल्यानं न्यूझीलंडची फलंदाजी आणखी भक्कम बनलीय.
बोल्ट विरुद्ध टॉप ऑर्डर
ट्रेंट बोल्टचा 2019 च्या सेमी फायनलमधील स्पेल भारतीय अद्याप विसरले नसतील. स्विंग गोलंदाजीला मदत करणाऱ्या वानखेडेच्या पिचवर बोल्ट अधिक धोकादायक ठरू शकतो.
लेग स्पिनर मिच सँटनरनं 9 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या असून तो न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. पाचव्या गोलंदाजांच्या 10 ओव्हर्स ही न्यूझीलंडची कमकुवत बाजू असून त्याचा फायदा टीम इंडियाला मिळेल.
दुसरी सेमी फायनल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
तारीख : गुरूवार, 16 नोव्हेंबर
ठिकाण : इडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता
दक्षिण आफ्रिका इतिहास रचणार?
दक्षिण आफ्रिकेनं पाचव्यांदा वन-डे विश्वचषक स्पर्धेची सेमी फायनल गाठलीय. पण, यापूर्वीच्या चारही सामन्यात त्यांचं आव्हान सेमी फायनलमध्येच आटोपलंय.
टेंबा बवुमाचा संघ ही अपयशी मालिका तोडत फायनलमध्ये पोहचण्याचा इतिहास रचणार का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
दक्षिण आफ्रिकेनं या स्पर्धेत पाचवेळा पहिल्यांदा फलंदाजी केलीय. या प्रत्येक सामन्यात त्यांनी 300 पेक्षा जास्त धावा केल्यात. चारवेळा तर 350 चा टप्पा ओलांडलाय.
दुसऱ्यांदा फलंदाजी करताना चारपैकी दोन सामन्यात त्यांचा पराभव झालाय. तर अन्य दोन सामन्यातही त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागलाय.
दक्षिण आफ्रिकेच्या या कमकुवत गोष्टीचा फायदा टॉस जिंकल्यावर ऑस्ट्रेलिया घेऊ शकते.
ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गोलंदाजांना मोठ्या सामन्यात गोलंदाजी करण्याचा तगडा अनुभव आहे. लेगस्पिनर अॅडम झम्पानं या स्पर्धेत 9 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत.
मार्काराम आणि क्लासेन हे स्पिन गोलंदाजी चांगली खेळणारे फलंदाज झम्पाला कसं खेळतात यावर आफ्रिकेच्या इनिंगचं भवितव्य स्पष्ट होईल.
सर्वात यशस्वी टीम
पहिल्या दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियन टीमनं या स्पर्धेत दमदार कामगिरी केलीय. भक्कम फलंदाजी हे या कामगिरीचं मुख्य कारण आहे.
डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड आणि मिच मार्श यांनी या स्पर्धेत शतक झळकावलंय. तर ग्लेन मॅक्सवेलनं अफगाणिस्तानविरुद्ध अनेक रेकॉर्ड मोडत थेट द्विशतक झळकावण्याचा विक्रम केलाय.
ऑस्ट्रेलियाची ही भक्कम फलंदाजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात फक्त 177 धावांमध्ये आटोपली होती.
रबाडा, कोएत्झी, जॅन्सन, महाराज, शम्सी, एन्गिडी असा वैविध्यपूर्ण मारा आफ्रिकेकडं आहे. आफ्रिकेनं मागील चार एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय.
कोलकातामध्ये मैदानात उतरताना ही एक गोष्ट दक्षिण आफ्रिकेच्या बाजूची आहे. पण, त्यांचा सामना विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीमशी होतोय.
इतिहास बदलण्याच्या इराद्यानं उतरणारी दक्षिण आफ्रिका आणि भक्कम इतिहासाचं पाठबळ लाभलेली ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सेमी फायनल या विश्वचषकातील सर्वात चुरशीची सामना ठरू शकतो.
Published By- Priya Dixit
चारही संघांची यापूर्वीची कामगिरी काहीही …