कव्हर ड्राईव्ह : भारताच्या विजयाची गॅरंटी कोण घेणार?

कव्हर ड्राईव्ह : भारताच्या विजयाची गॅरंटी कोण घेणार?

शीर्षक वाचून तुम्ही थोडसं चकरावला असाल ना? विजय भाऊ आता राजकीय विश्लेषक बनलेत की काय. असो. त्याचं झालं असं की हा लेख लिहीत असताना, माझे परममित्र गजाभाऊ यांचा फोन माझ्या भ्रमणध्वनीवर आला. आणि त्यांनी मला प्रश्न केला की भारतीय संघाच्या विजयाची गॅरंटी काय? एवढं बोलून त्यांनी फोन कट केला. मी थोडसं चकरावलो. म्हटलं आज भारतीय संघाच्या विजयाच्या गॅरंटीवर आपण बोलूच. नव्हे त्यावर प्रकाशझोत टाकू. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर झाला. अर्थात याला बरेच दिवस लोटले. संघ जाहीर झाल्यानंतर आगरकर गुऊजींकडून काही प्रश्नांची उत्तरे मिळाले नाहीत. उपकर्णधार हार्दिक पंड्या विश्वचषक स्पर्धेत फिट राहील का? आणि जर तो राहिला तर तो किती सामने खेळेल? कॅरिबियन बेटावर चार मंदगती गोलंदाज कशासाठी? आणि विश्वचषक स्पर्धेपूर्वी आयपीएलसारख्या मोठ्या फॉरमॅटमधून नवोदित चेहऱ्यांना संधी का नाही? असे अनेक मुद्दे वादातीत राहिले. माझ्या मते रिंकू सिंगला संघात घेतले असते तर तो कदाचित उजवा ठरला असता. डेथ ओव्हर्समध्ये तो वादळी फलंदाजी करू शकतो हे त्याने वारंवार दाखवून दिले. दुसरीकडे मराठमोळा ऋतुराज गायकवाड नसणं हे  माजी सलामीवीर के. श्रीकांत यांना पचनी पडलं नव्हतं हे विसरून चालणार नाही. याच ऋतुराजच्या 2023 च्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मालिकेत सर्वाधिक 223 धावा त्याही 150 स्ट्राइकरेटने. वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर जसप्रीत बुमराह, सिराज, अर्शदीप सिंग हे त्रिकूट भारतीय संघात आहेत. दुसरीकडे शिवम दुबे, हार्दिक पंड्या हे अष्टपैलू खेळाडू आहेत. वेळ पडली तर हे दोघेही मध्यमगती मारा बऱ्यापैकी करू शकतात.
परंतु हार्दिक पंड्याचा विचार केला तर आयपीएलमधील त्याची कामगिरी ही सुमार दर्जाचीच होती. तर शिवम दुबेला चेन्नईने जास्त वाव दिला नाही. या दोघांपैकी एकाला डच्चू देत बुमराह पाठोपाठ अचूक यॉर्कर टाकणारा मुकेश कुमार कधीही संघात बसत होता. ज्यावेळी फिरकी चौकडी संघात दिसली त्यावेळी पत्रकारांनी रोहितला चौथ्या फिरकीपटूबद्दल प्रश्नांकित केलं होतं. त्यावेळी रोहित म्हणाला होता की चौथ्या फिरकीपटूबद्दल आत्ताच स्पष्टीकरण देणार नाही. त्याचे उत्तर तुम्हाला स्पर्धेवेळी मिळेल. परंतु या फिरकी चौकडीत चहल संघात असणं थोडसं आश्चर्यकारक वाटलं. वर्षभर भारतीय संघाबरोबर नसलेला अचानक भारतीय संघात असणं हे न उलगडणारंच कोडं होतं. असो. आता वेळ निघून गेली. निवडलेला 15 खेळाडूंमधून आपल्याला मार्गक्रमण करायचे आहे. यात विजयाची गॅरंटी कोण घेणार? भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा की ऑलटाईम फेवरेट असणारा विराट कोहली की टी-20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादव? दुसरीकडे अनुभवी बुमराहलासुद्धा भारताच्या विजयाची तळी उचलावी लागेल. ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी हम साथ साथ है असं म्हटलं तर नवल वाटू नये. थोडक्यात काय तर सर्वांनी थोडा थोडा वाटा उचलत भारतीय संघाचा विजय हा सुकर केला पाहिजे. परंतु त्यासाठी रोहितला अचूक डावपेच हे आखावेच लागतील. शेवटी विजयाची गॅरंटी 140 करोडोवासियांना देणार  कोण? याचं उत्तर कॅप्टन या नात्याने रोहित शर्मालाच द्यायचे आहे. शेवटी विजयाचे वाटेकरी सर्वजण असतात परंतु पराभवाचे विष सरते शेवटी कर्णधारालाच पचवावे लागते. याच रोहित शर्माबद्दल मी उद्याच्या लेखात सविस्तर लिहिणार आहे. तोपर्यंत भारतीय संघाला शुभेच्छा!
विजय बागायतकर