‘मोदी 3.0’ पर्वारंभ

‘मोदी 3.0’ पर्वारंभ

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी : एकूण 72 जण शपथबद्ध, महाराष्ट्रातील 6 तर कर्नाटकातील 5 जणांना संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांनी रविवार, 9 जून रोजी संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. असे करणारे ते जवाहरलाल नेहरूंनंतरचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी देवाच्या नावाने शपथ घेतली. यानंतर राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी. न•ा आणि शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतली. नरेंद्र मोदींसह एकूण 72 मंत्र्यांनी घेतली असून त्यामध्ये रालोआमधील घटकपक्षांनाही सामावून घेण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील ‘मोदी 3.0’ मंत्रिमंडळात मोदींसह 72 मंत्री शपथबद्ध झाले आहेत. यामध्ये 30 पॅबिनेट मंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. जवळपास दहा हजारहून अधिक विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला शपथविधी सोहळा 9 वाजून 50 मिनिटांपर्यंत चालला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुरुवातीला 7 वाजून 25 मिनिटांनी नरेंद्र मोदी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला 7 देशांच्या नेत्यांशिवाय देशातील सिनेतारकांनीही हजेरी लावली होती.
पंडित नेहरुंनंतर आता नरेंद्र मोदी…
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळाले आहे. 73 वर्षीय नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे दुसरे नेते ठरले आहेत. नेहरूंनी 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या होत्या. तर मोदींनी 2014, 2019 आणि आता 2024 मधील लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करत पंतप्रधानपद आपल्याकडे टिकवून ठेवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथबद्ध झाल्यानंतर राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांनीही पॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अशा स्थितीत गृहमंत्रालय कोणाकडे जाणार, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. देशभरातील 24 राज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले आहे.
‘मोदी 3.0’ मध्ये जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ओबीसी गटातील 27, एससी 10, एसटी 5 आणि अल्पसंख्याक समुदायातील 5 नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तसेच घटक पक्षांच्या 11 जणांना स्थान दिले आहे. नव्या मंत्रिमंडळात नेत्यांच्या अनुभवाचा फायदा उचलण्याला प्राधान्य राहिलेले दिसून येत आहे. एकूण मंत्र्यांपैकी 43 मंत्री तीन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर, 39 जणांनी यापूर्वीही मंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. तर 23 मंत्र्यांनी राज्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेले आहे.
निमंत्रितांची मांदियाळी
पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आदी विशेष निमंत्रित उपस्थित होते. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. त्यात गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती सहभागी झाले होते. याशिवाय अभिनेता शाहऊख खान, अक्षय कुमार, रजनीकांत, विक्रांत मेस्सी आणि राजकुमार हिरानी यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले होते. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार कंगना राणावतही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. याशिवाय दक्षिणेतील सुपरस्टार पवन कल्याणही या कार्यक्रमात सहभागी झाला होता.
निकालानंतर पाचव्या दिवशी शपथबद्ध
या लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 कमी आहेत. मात्र, एनडीएने 293 जागा जिंकल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाल्यानंतर यावेळी नरेंद्र मोदींनी निकालानंतर 5 दिवसांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यापूर्वी 2019 मध्ये त्यांनी 30 मे रोजी शपथ घेतली होती. तेव्हा 23 मे रोजी निकाल जाहीर झाला होता. तर 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी 26 मे रोजी शपथ घेतली होती. त्यावेळी निकालानंतर 10 दिवसांनी शपथविधी सोहळा पार पडला होता.
मंत्र्यांना मार्गदर्शन
शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी संभाव्य मंत्र्यांशी चहापानावर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी 100 दिवसांच्या रोडमॅपवर चर्चा केली आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सांगितले की, 100 दिवसांच्या कार्यसूचीचा कृती आराखडा योग्यरितीने अंमलात आणावा लागेल आणि प्रलंबित योजना पूर्ण कराव्या लागतील, अशी सूचना केल्या आहेत. आता शपथविधी पार पडला असून लवकरच कॅबिनेट बैठक झाल्यानंतर खातेवाटपही जाहीर केले जाणार आहे.

‘मोदी 3.0’मधील मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कॅबिनेट मंत्री

राजनाथ सिंग – उत्तर प्रदेश
अमित शहा – गुजरात
नितीन गडकरी – महाराष्ट्र
जे. पी. न•ा – हिमाचल प्रदेश
शिवराज सिंह चौहान – मध्यप्रदेश
निर्मला सीतारामन – कर्नाटक
एस. जयशंकर – गुजरात
मनोहरलाल खट्टर – हरियाणा
एच. डी. कुमारस्वामी – कर्नाटक
पियुष गोयल – महाराष्ट्र
धर्मेंद्र प्रधान – ओडिशा
जीतनराम मांझी – बिहार
राजीव रंजन सिंह – बिहार
सर्वानंद सोनोवाल – आसाम
विरेंद्र कुमार खटीक – मध्यप्रदेश
राममोहन नायडू – आंध्रपदेश
प्रल्हाद जोशी – कर्नाटक
जुएल ओरांव – ओडिशा
गिरिराज सिंह – बिहार
अश्विनी वैष्णव – ओडिशा
ज्योतिरादित्य सिंधिया – मध्यप्रदेश
भूपेंद्र यादव – राजस्थान
गजेंद्रसिंह शेखावत – राजस्थान
अन्नपूर्णा देवी – झारखंड
किरेन रिजिजू – अरुणाचल प्रदेश
हरदिपसिंग पुरी – उत्तर प्रदेश
मनसुख मांडविया – गुजरात
जी. किशन रे•ाr – तेलंगणा
चिराग पासवान – बिहार
सी. आर. पाटील – गुजरात

 
राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार

राव इंद्रजीत सिंग – हरियाणा
जितेंद्र सिंग – जम्मू काश्मीर
अर्जुन राम मेघवाल – राजस्थान
प्रतापराव जाधव – महाराष्ट्र
जयंत चौधरी – उत्तर प्रदेश

राज्यमंत्री

जितिन प्रसाद – उत्तर प्रदेश
श्रीपाद नाईक – गोवा
पंकज चौधरी – उत्तर प्रदेश
कृष्णपाल गुर्जर – हरियाणा
रामदास आठवले – महाराष्ट्र
रामनाथ ठाकूर – बिहार
नित्यानंद राय – बिहार
अनुप्रिया पटेल – उत्तर प्रदेश
व्ही. सोमण्णा – कर्नाटक
चंद्रशेखर पेम्मासानी – आंध्रप्रदेश
एस पी सिंग बघेल – उत्तर प्रदेश
शोभा करंदलाजे – कर्नाटक
किर्तीवर्धन सिंह – उत्तर प्रदेश
बनवारीलाल वर्मा – उत्तर प्रदेश
शंतनू ठाकूर – पश्चिम बंगाल
सुरेश गोपी – केरळ
एल मुरुगन – तामिळनाडू
अजय तम्टा – उत्तराखंड
बंडी संजय कुमार – तेलंगणा
कमलेश पासवान – उत्तर प्रदेश
भागीरथ चौधरी – राजस्थान
सतीश दुबे – बिहार
संजय सेठ – झारखंड
रवनीत सिंग बिट्टू – पंजाब
दुर्गादास उईके – मध्यप्रदेश
रक्षा खडसे – महाराष्ट्र
सुकांत मजूमदार – पश्चिम बंगाल
सावित्री ठाकूर – मध्यप्रदेश
तोखन साहू – छत्तीसगड
राजभूषण निषाद – बिहार
श्रीनिवास वर्मा – आंध्रप्रदेश
हर्ष मल्होत्रा – दिल्ली
निमूबेन बांभनिया – गुजरात
मुरलीधर मोहोळ – महाराष्ट्र
जॉर्ज कुरियन – केरळ
पवित्रा मार्गेरिटा – आसाम

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा केंद्रीय मंत्रिमंडळात
पंतप्रधान मोदींनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंचावर दुसऱ्या क्रमांकावर बसले होते. माजी गृहमंत्री अमित शहा तिसऱ्या क्रमांकावर, नितीन गडकरी चौथ्या क्रमांकावर, जे. पी. नड्डा पाचव्या आणि शिवराज सिंह चौहान सहाव्या क्रमांकावर आहेत. निर्मला सीतारामन सातव्या तर माजी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आठव्या क्रमांकावर आहेत. यानंतर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर बसलेले दिसले. विद्यमान भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे आता भाजपाध्यक्ष बनण्याची संधी नव्या नेत्याला मिळणार आहे.
शिवराजसिंह चौहान फ्रंट फूटवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये भाजपचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मान उंचावला आहे. लोकसभा निवडणुकीत क्लीनस्विप करणाऱ्या भाजपचे नेतृत्व करणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांना यावेळी मोदी सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्रिपद मिळणार आहे. यामुळेच त्यांनी पंतप्रधान मोदींनंतर सहाव्या क्रमांकावर पॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील छायाचित्रे पाहिल्यास पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होणारे भावी मंत्री मंचावर बसले होते. यामध्ये शिवराज सिंह चौहान मोदी सरकार 2.0 मधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अगोदर आसनस्थ झाले होते. यावरून शिवराजसिंह चौहान मोदी सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत, असा अंदाज बांधता येतो.
राज्यनिहाय वर्गीकरण
राज्यांचा विचार करता उत्तर प्रदेशातील सर्वाधिक मंत्री शपथबद्ध झाले आहेत. तसेच बिहारमधील दहा जणांना संधी मिळाली आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रत्येकी 6 तर कर्नाटकातील पाच जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मध्यप्रदेशातून 5, राजस्थानातून 4 मंत्री समाविष्ट करण्यात आले असून दिल्लीतून हर्ष मल्होत्रा यांना सुवर्णसंधी चालून आली. तसेच केरळमधून निवडून आलेले एकमेव भाजप खासदार सुरेश गोपी यांच्याबरोबरच भाजप प्रदेशाध्यक्ष जॉर्ज  कुरियन यांनाही मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे.
चिराग पासवान ठरले ‘हिरो’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी एक एक करत मंचावर पोहोचून शपथ घेतली. बहुतेक मंत्री कुर्ता-पायजमा अशा पारंपरिक पोशाखात शपथ घेण्यासाठी आले होते, पण एक मंत्री काळ्या रंगाच्या कोट-पँटमध्ये कपाळावर लांबलचक टिळक लावून शपथ घेण्यासाठी आले तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या होत्या. हा अतिशय देखणा दिसणारा मंत्री दुसरा कोणी नसून बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतचा ‘हिरो’ आहे. इतकेच नाही तर विशेष म्हणजे मोदी सरकार 3.0 मधील पॅबिनेट मंत्र्यांमध्ये समाविष्ट असलेला हा मंत्री सर्वात तऊण आहे. या मंत्र्यांची ओळख चिराग पासवान अशी आहे. ते लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि हाजीपूरचे लोकसभा खासदार असून ते मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सर्वात तऊण पॅबिनेट मंत्री बनले आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर पुन्हा आपल्या आसनावर जाऊन बसण्यापूर्वी चिराग पासवान यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह इतर मंत्र्यांना आदराने वंदन केले. यावेळी मोदींनी काही सेकंद त्यांच्याशी संवाद साधत त्यांची पाठही थोपटली. एकंदर चिराग पासवान शपथविधी सोहळ्यात भाव मारून गेले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
चिराग जेव्हा शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर पोहोचताच ते बॉलिवूडच्या हिरोप्रमाणेच दिसत होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून नशीब आजमावले आहे. चिराग पासवान आणि कंगना राणावत यांनी 2011 मध्ये बॉलिवूड चित्रपट ‘मिल ना मिले हम’मध्ये एकत्र काम केले होते. यात कंगना आणि चिराग मुख्य भूमिकेत होते. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांवर कोणताही प्रभाव सोडू शकला नाही आणि फ्लॉप ठरला होता.