काँग्रेस म्हणतेय जागा सोडली नाही…तर ठाकरे म्हणतात विषय संपला!

काँग्रेस म्हणतेय जागा सोडली नाही…तर ठाकरे म्हणतात विषय संपला!

विश्वजीत कदम म्हणतात सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार : अजूनही महिना आहे. त्यामुळे ठाकरेचे मन काँग्रेसचे नेते वळवतील : सांगलीच्या जागेचा तिढा जैसे थे

सांगली प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा आमच्यासाठी सुटला आहे असे स्पष्ट शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. पण हे काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांना मात्र हे मान्य नाही त्यांनी मेरीटच्या आधारे ही जागा काँग्रेसचीच आहे त्यामुळे ती काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवाराच ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत महाविकास आघाडीचे नेते एकत्रित येवून या जागेचा तिढा संपवत नाहीत तोपर्यंत हा जागेचा तिढा सुटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उध्दव ठाकरेकडून सांगलीची जागा काँग्रेसला देण्यास स्पष्ट नकार
शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांनी मुंबईत शिवालय येथे बुधवारी दुपारी पत्रकार बैठक घेतली या बैठकीत त्यांना पत्रकारांनी सांगलीच्या जागेबाबत प्रश्न विचारला असता, उध्दव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेचा विषय संपला आहे. सांगलीच्या जागेवर शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी आठवड्यापुर्वीच दिली आहे. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत कोणताही पुर्नविचार करण्यात येणार नाही. ज्याप्रमाणे कोल्हापूर, अमरावती आणि इतर दोन ठिकाणच्या जागा शिवसेनेने सोडल्या आहेत. त्याप्रमाणे काँगेसनेही सांगलीच्या जागेचा विषय आता थांबवा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या सांगलीच्या कार्यकर्त्यांनी आता महाविकास आघाडीचा धर्म पाळून त्यांनी प्रचार सुरू करावा, असे आवाहनही केले आहे.
विश्वजीत कदम मात्र ही जागा सांगलीचीच असा दावा करत आहेत.
माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी बुधवारी कोल्हापूर येथे पत्रकार बैठक घेतली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट सांगितले की सांगलीच्या जागेचा महाविकास आघाडीमध्ये अद्यापही निर्णय झाला नाही. सांगलीची जागा मेरीटवर काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. जोपर्यंत ती काँग्रेसला मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. प्रदेश कार्यकारिणी आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नेत्यांना आम्ही सांगलीकरांनी याबाबत सर्व भावना समजून सांगितल्या आहेत. त्यामुळे सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जोपर्यंत तिढा सोडवत नाही तोपर्यंत सर्व बैठकीला अनुपस्थित राहणार
सांगलीच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि सर्व पक्षाचे नेते एकत्रित बसल्यावर हा तिढा सहजपणे सोडविला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले तसेच सांगलीच्या जागेचा तिढा जोपर्यंत काँग्रेस पक्ष सोडवणार नाही तोपर्यंत प्रदेश काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला आपण हजर राहणार नाही असे स्पष्टपणे पत्राव्दारे सांगितले असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत जाहिरनामा संदर्भात बैठक झाली या बैठकीला ते अनुपस्थित होते.
सांगलीच्या जागेबाबत मात्र सर्वच जण अनभिज्ञ
सांगलीची जागा महाविकास आघाडी कोणाच्या पदरात टाकणार याबाबत मात्र सर्व काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते अनभिज्ञ आहेत. दरम्यान शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी सांगलीची जागा आमचीच हे स्पष्टपणे सांगितल्याने सांगली शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांचे कार्यकर्ते मात्र जोशपुर्ण कामाला लागले आहेत. दरम्यान शेवटच्या क्षणी काहीही होवू शकते अशी शक्यता असल्याने तेही त्याबाबत साशंक आहेत. त्यामुळे सांगलीच्या जागेचे काय हाच खरा सवाल महत्वाचा ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत सर्व संपेल
दरम्यान याबाबत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत विचारले असता त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची लवकरच आणखीन एक बैठक होणार आहे. या बैठकीत सांगलीच्या जागेचा विषय निश्चितपणे संपेल पण तोपर्यंत सांगलीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी संयम ठेवावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
…तोपर्यंत आपण काहीही बोलणार नाही
सांगलीच्या जागेबाबत अधिकृतपणे काँग्रेस प्रदेशचे नेते स्पष्टपणे बोलत नाही तोपर्यंत आपण काहीही बोलणार नसल्याचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी सांगितले. अद्यापही या जागेचा तिढा सुटला नाही जोपर्यंत हा तिढा सुटत नाही आणि काँग्रेस नेते स्पष्टपणे भूमिका सांगत नाहीत तोपर्यंत आपण काहीही बोलणार नाही असेही त्यांनी सांगितले.