‘केजरीवालप्रमाणे जेलमध्ये टाकू, नाहीतर उडवून टाकू’; बच्चू कडूंना धमकी

‘केजरीवालप्रमाणे जेलमध्ये टाकू, नाहीतर उडवून टाकू’; बच्चू कडूंना धमकी

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना अमरावतीत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या नामांकन सभेत अज्ञात व्यक्तीकडून चिठ्ठीतून धमकी देण्यात आली आहे. ‘जास्त उडउड करू नका, तुलाही केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकू, नाहीतर उडवून टाकू,” अशी धमकी देण्यात आली आहे.
बुधवारी (दि.३) शहरातील नेहरू मैदानात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या नामांकनासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना खांद्यावर घेतले होते. दरम्यान भाषणासाठी जात असताना त्यांच्या हातात कुणीतरी धमकीची चिठ्ठी दिली. याची माहिती सभा सुरू असताना भाषणातूनच कडू यांनी उपस्थितांना दिली. रात्री उशिरा प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
आमदार कडू यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारच्या तिकिटावर शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. राणादांपत्य आणि बच्चू कडू यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून राजकीय संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचे घटक आहेत. भाजप देखील महायुतीचा घटक असून अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या उमेदवारीला उघड विरोध करून आपला उमेदवार मैदानात उतरविला आहे. दरम्यान, बच्चू कडू यांना आलेल्या धमकीनंतर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली आहे.
हेही वाचा : 

टीकेचा आसूड ओढत गौरव वल्‍लभ यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; म्‍हणाले, ‘सनातन…
काँग्रेसमधून हकालपट्टी होण्‍यापूर्वीच मी राजीनामा दिला होता : संजय निरुपम
वेध लोकसभेचे-१९९१ ला दोन महिला उमेदवार विजयी

Latest Marathi News ‘केजरीवालप्रमाणे जेलमध्ये टाकू, नाहीतर उडवून टाकू’; बच्चू कडूंना धमकी Brought to You By : Bharat Live News Media.