मुख्यमंत्री शिंदेंचा कोल्हापुरात रोड शो! महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुपर संडेला महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्री शिंदेंचा कोल्हापुरात रोड शो! महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुपर संडेला महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक येथे दुचाकी रॅलीची सांगता

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी दुपारी कोल्हापूर शहरात रोड शो झाला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महायुतीने शहरातील प्रमुख मार्गावरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुचाकी रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रोड शोला सुरुवात झाली. गळ्यात भगवे मफलर, हातामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्वज, डोक्यावर भगवी टोपी परिधान करुन महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रा. संजय मंडलिक, महायुतीचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रॅली पुढे स्वयंभू गणेश मंदिर, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे निवृत्ती चौक येथे आली तेथे रॅलीची सांगता झाली.
रॅलीमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आदिल फरास, वीरेंद्र मंडलिक, बाबा पार्टे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, अंकुश निपाणीकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.