उचगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस

उचगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस

गटारी तुंबल्याने पाणी थेट रस्त्यावर : स्वच्छतेकडे दुर्लक्ष : अनेक घरांतून पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान
उचगाव/ वार्ताहर
उचगाव परिसरात मृग नक्षत्राच्या प्रारंभीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र शनिवारी चारच्या सुमाराला झालेल्या मुसळधार ढगफुटी सदृश पावसामुळे, पावसाचे पाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक, मठ गल्ली आदी भागातील घरातमध्ये पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे बरेच नुकसान झाले आहे.
उचगाव कोवाड या मार्गाच्या दुतर्फा असलेल्या गटारी स्वच्छतेकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याने या गटारी स्वच्छ नसल्याने सदर पाण्याचा पूर्ण लोंढा रस्त्यावरून वाहत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अनेक घरांमधून शिरून घरातील अनेक वस्तू खराब झाल्याचे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. याबरोबरच उचगाव अप्रोच रोडच्या दुतर्पा असलेल्या गटारीही केरकचऱ्याने भरल्याने पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पाणी शेतवडीत जाऊन शेतवडीचेही मोठे नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गटारीचे पाणी विहिरीत
तसेच उचगाव कोवाड मार्गावरील विष्णू मोकाशी यांच्या घराशेजारील गटारी पूर्णपणे बुजलेल्या असल्याने रस्त्याच्या बाजूने येणारा पाण्याचा लोंढा विहिरीत जाऊन विहिरीतील पाणी गढूळ झाल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
उचगावच्या पूर्व भागातील मठ गल्ली या भागात माळ जमिनीवरून येणारा पाण्याचा लोंढा गावात शिऊन अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील अनेक वस्तू खराब झाल्या आहेत. उचगाव परिसरात यावर्षी हा झालेला सर्वात मोठा पाऊस असल्याचे अनेकातून बोलले जात होते.