गॅरंटी योजना स्थगित करणार नाही!

गॅरंटी योजना स्थगित करणार नाही!

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
गॅरंटी योजनांविषयी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी केलेल्या विधानामुळे जनतेत गॅरंटी योजनांविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे. दरम्यान, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गॅरंटी योजना मते मिळविण्यासाठी नव्हे, गरिबांच्या कल्याणासाठी जारी केल्या आहेत. त्या स्थगित केल्या जाणार नाहीत, असे सांगितले.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सरकार गॅरंटी योजना बंद करणार, असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली होती. आता लोकसभा निवडणूक संपली असून रामनगर जिल्ह्यातील मागडीचे काँग्रेस आमदार एच. सी. बालकृष्ण आणि म्हैसूर-कोडगू मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार एम. लक्ष्मण यांनी जनतेला गॅरंटी योजनांची आवश्यकता नसल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे जनतेत गॅरंटी योजनांविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे.
पक्षातील दोन नेत्यांच्या वक्तव्यांविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण देताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी कर्नाटक सरकारने जारी केलेल्या पाच गॅरंटी योजना कोणत्याही कारणास्तव बंद केल्या जाणार नाहीत. या योजना सुरू ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. राजकीय दृष्टीकोनातून या योजना जारी केलेल्या नाहीत. गरीब, कामगार, शेतकरी, मजूर यांच्या अनुकुलतेसाठी गॅरंटी योजना जारी केल्या आहेत. दारिद्र्या रेषेखालील कुटुंबांना या योजनांचा अधिक लाभ मिळत आहे, असे ते म्हणाले.
परिवहनमंत्री रामलिंगारे•ाr यांनी देखील गॅरंटी योजना स्थगित केल्या जाणार नसल्याचे सांगितले आहे. मते मिळविण्यासाठी या योजना जारी केल्या नव्हत्या. या योजना यापुढेही सुरुच राहतील. शक्ती योजनेसाठी सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात 5,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे त्यांनी सांगितले.