आज, उद्या जोरदार पावसाची शक्यता

आज, उद्या जोरदार पावसाची शक्यता

येलो अलर्ट जारी : बुधवारी पारा आणखी वाढला
पणजी : मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पारा आणखी वाढला. मुरगावात 36.5 डि.से. एवढे तापमान राहिले. आज व उद्या गोव्यात जोरदार वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला व येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात मंगळवारी अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या पडणारा पाऊस हा वळीवाचा म्हणून ओळखला जातोय. प्रत्यक्षात पावसाळा आता केवळ 15 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे व उकाड्याने नागरिक हैराण झालेले आहेत. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांकरिता येलो अलर्ट जारी केला आहे आणि आज सायंकाळी देखील गोव्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडणार, असा इशारा दिला आहे. मंगळवारी राज्यात विशेषत: पणजीत 36 डि.से. एवढे तापमान होते. बुधवारी वास्कोमध्ये 36.5 डि.से. एवढे तापमान झाले. गोव्यात 19 पर्यंत पावसाळी वातावरण राहिल आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडणार, असा इशारा हवामान खात्याने दिला. पणजीत बुधवारी 35. 8 म्हणजे 36 डि.से. एवढे तापमान राहिले. गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 1 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद दाबोळी व फोंडा येथे झाली. सांखळीत पाऊण इंच, तर वाळपई व पणजीत 1 से.मी. पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासांत राज्यात 35 ते 36 डि.से. या दरम्यान तापमान राहिल, असा इशारा हवामान खात्याने पुन्हा एकदा दिला आहे.