महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत

महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत

56 वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : दोन्ही संघ प. बंगाल विरुध्द लढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रच्या दोन्ही संघानी उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात अपेक्षित यश मिळवत उपउपांत्य फेरी गाठली आहे. यामध्ये पुरूष गटाने महाराष्ट्राने यजमान दिल्लीला तर महिला गटात पंजाबला पराभवाचा धक्का दिला आहे.
उपउपांत्यपूर्व फेरीतील महाराष्ट्राच्या महिलांनी पंजाबचा (24-10) एक डाव 14 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रातर्फे अश्विनी शिंदे (3.20 मि. संरक्षण व 6 गुण), रेश्मा राठोड (3.10 मि. संरक्षण व 6 गुण), प्रियांका इंगळे (2.30 मि. संरक्षण व 8 गुण), काजल भोर (3.10 मि. संरक्षण व 2 गुण), कोमल धारवटकर (3.20 मि. संरक्षण) यांनी केलेला धमाकेदार खेळ पंजाबला पराभवाच्या खाईत लोटून गेला. तर पंजाबतर्फे निता देवीने  (1.40, 1.30 मि. संरक्षण) एकाकी लढत दिली तिला उर्वरित खेळाडूंकडून योग्य साथ मिळाली नाही.
पुरुष गटात महाराष्ट्रने यजमान दिल्लीचा 28-26 असा 2 गुण व जवळजवळ साडेचार मिनिटांपेक्षा जास्त वेळ राखून पराभव केला. महाराष्ट्राच्या या विजयात वृषभ वाघ (1.40, 1.20 मि. संरक्षण), लक्ष्मण गवस (1.40, 1.30 मि. संरक्षण व 6 गुण), प्रतिक मोरे (1.40 मि. संरक्षण व 6 गुण), राहूल मंडल (1.10 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी जोरदार खेळ करत दिल्लीला डोके वर काढण्याची जरासुद्धा संधी दिली नाही. तर पराभूत दिल्लीकडून अजय कुमार (1.10 मि. संरक्षण व 4 गुण), मेहूल (1.40 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी चांगला खेळ केला.
रेल्वे, केरळ, कोल्हापूरची विजयी आगेकूच
इतर सामन्यांमध्ये पुरुषांमध्ये रेल्वेने महाराष्ट्र पोलिसांचा 1 डाव राखून 36-32, केरळने विदर्भाचा 40-22, ओडीसाने तेलंगणाचा 1 डाव राखून 22-20,  कर्नाटकने पुदुचेरीचा 1 डाव राखून 20-18, कोल्हापूरने तामिळनाडूचा 26-22, आंध्र प्रदेशने उत्तर प्रदेशचा 32-20, प. बंगालने छत्तीसगडचा 1 डाव राखून 22-20 पराभव करत उपउपांत्य फेरी गाठली.
महिलांमध्ये प. बंगालने तामिळनाडूचा 20-14, गुजरातने हरियाणाचा 24-12, ओडीशाने उ. प्रदेशचा 1 डाव राखून 20-10, दिल्लीने राजस्थानचा 1 डाव राखून 26-18, कर्नाटकने विदर्भाचा 30-18, कोल्हापूरने केरळचा 1 डाव राखून 16-14 व भारतीय विमान प्राधिकरणाने आंध्र प्रदेशाचा 1 डाव राखून 24-10  पराभव करून उपउपांत्य फेरी गाठली.