बिदरमध्ये तब्बल 15 क्विंटल गांजा जप्त

बिदरमध्ये तब्बल 15 क्विंटल गांजा जप्त

ओडिशाहून महाराष्ट्राकडे वाहतूक : 15 कोटी किंमत : दोघांना अटक : विशेष पथकाची कारवाई
बेळगाव : ओडिशाहून महाराष्ट्राला जाणारा तब्बल 15 क्विंटल गांजा बिदर जिल्ह्यात जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या वनमारपळ्ळी चेकपोस्टजवळ बेंगळूर व बिदर पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून जप्त गांजाची किंमत सुमारे 15 कोटी रुपये इतकी होते. बिदरचे जिल्हा पोलीसप्रमुख चन्नबसवण्णा एस. एल. यांच्या मार्गदर्शनाखाली रघुवीर सिंग यांच्या नेतृत्वाखालील बेंगळूर व बिदर पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून हुमणाबादजवळील हंडीकेरा येथील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व साठा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांना पोहोचविण्यात येणार होता. एका ट्रकमध्ये बाहेरच्या बाजूने विटा भरून आतमध्ये गांजा वाहतुकीसाठी गुप्त चेंबर बनविले होते. त्या चेंबरमध्ये गांजाची पाकिटे ठेवण्यात आली होती. यासंबंधीची माहिती मिळताच बेंगळूर येथील नार्कोटिक्स क्राईम ब्युरोचे अधिकारी व बिदर पोलिसांनी संयुक्तपणे वनमारपळ्ळीजवळ ट्रक अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. ओडिशा येथील मलकानगिरी जंगलातून हा गांजा महाराष्ट्राला नेण्यात येत होता, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख चन्नबसवण्णा एस. एल. यांनी दिली.
तब्बल दीड टन गांजा जप्त
आंध्रप्रदेश व ओडिशाच्या सीमेवरून मुंबईला जाणारा ट्रक अडवून तब्बल दीड टन गांजा जप्त केला होता. अवराद तालुक्यातील याच वनमारपळ्ळी तपास नाक्यावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवराद पोलीस स्थानकात अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची चौकशी करण्यात येत आहे.