प्लास्टिकविरोधी मोहीम पुन्हा तीव्र

प्लास्टिकविरोधी मोहीम पुन्हा तीव्र

बुधवारी 150 किलो प्लास्टिक जप्त : 12 हजार रुपये दंडही वसूल
बेळगाव : महापालिकेकडून प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी विविध ठिकाणी धाडी घालून 150 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच 12 हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकवर बंदी घालण्याबाबत केंद्र सरकारने महानगरपालिकांना आदेश दिले आहेत. त्यानुसारच बेळगाव महानगरपालिकेने ही मोहीम सुरू केली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये प्लास्टिकविरोधी मोहीम राबवून प्लास्टिक पिशव्या, तसेच प्लास्टिक इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला आहे.
प्लास्टिकमुळे शहरामध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचबरोबर गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचाच कचरा आढळत आहे. त्यामुळे ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. मात्र प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करूनच ही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पर्यावरण दूषित होत असून जनावरेही हे प्लास्टिक खात आहेत. त्यामुळे प्लास्टिकवर निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.