प्रशासकीय इमारतींची कामे दर्जेदार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रशासकीय इमारतींची कामे दर्जेदार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रशासकीय इमारतींची कामे करताना आगामी 100 वर्षे टिकणारी दर्जेदार कामे करा, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी प्रसंगी दिले. या वेळी नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहनोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण,बाप्पा बहीर, ‘सीईओपी’चे उपकुलगुरु सुधीर आगाशे, प्रा. भालचंद्र बिराजदार, निबंधक दयाराम सोनवणे आदी उपस्थित होते.
’नोंदणी भवन’ येथील विकासकामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून कामाबाबत माहिती घेतली.
‘नोंदणी भवन’ची कामे करताना प्रामुख्याने वीज, वाहनतळ, सोलर पॅनल, जिन्यांमधील अंतर, पायर्‍या, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुरेसा सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावे. भवनच्या दर्शनी भागात विभागाचे मोठ्या आकाराचे बोधचिन्ह लावावे. भिंतीच्या कामासाठी मजबूत विटेचा वापर करावा. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचा ऐतिहासिक वारसा जपून कामे करावीत. इमारतीसाठी टिकाऊ दगडाचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करण्यात यावा. माजी विद्यार्थ्यांच्या कल्पना, सूचनांचा विचार करावा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. इमारतींचे काम पूर्ण झाल्यावर देखभाल-दुरुस्तीवरचा खर्च कमीत कमी झाला पाहिजे. वाहनतळाचे नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबरच नागरिकांच्या वाहनाचांही विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील पवार यांनी दिली. पवार यांनी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी इमारत परिसरातील विविध इमारती आणि प्रयोगशाळेची पाहणी करून संबंधित विभाग प्रमुखांकडून येथील कामांबाबत माहिती घेतली.
हेही वाचा

पुण्यातील नामचीन टोळीची सांगलीत पार्टी
जयसिंगपूर : ‘त्या’ नकाशामुळे 10 गावांत खळबळ
भटके-विमुक्तांची नावे आता मतदारयादी, शिधापत्रिकेत; विशेष मोहीम राबविणार

Latest Marathi News प्रशासकीय इमारतींची कामे दर्जेदार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार Brought to You By : Bharat Live News Media.