IT स्टॉक्सच्या जोरावर बाजाराची घौडदौड, बायबॅक ऑफरमुळे TCS चा शेअर टॉप गेनर

IT स्टॉक्सच्या जोरावर बाजाराची घौडदौड, बायबॅक ऑफरमुळे TCS चा शेअर टॉप गेनर

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांमुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार हिरव्या चिन्हात बंद झाला. सुरुवातीच्या किरकोळ घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने आज गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात जोरदार रिकव्हरी केली. आजच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे ६५० अंकांनी वाढून ६६,३२४ वर पोहोचला. तर निफ्टीने १९,८४६ वर व्यवहार केला. त्यानंतर ही तेजी कमी होऊन सेन्सेक्स ३०६ अंकांच्या वाढीसह ६५,९८२ वर बंद झाला. तर निफ्टी ८९ अंकांच्या वाढीसह १९,७६५ वर स्थिरावला. विशेष म्हणजे आजच्या सत्रात सेन्सेक्स दिवसाच्या निचांकावरून ४७५ अंकांनी सावरला.
आजच्या तेजीत माहिती तंत्रज्ञान (IT) शेअर्स आघाडीवर राहिले. आयटी निर्देशांक सुमारे ३ टक्क्यांनी वाढला. हेवीवेट रिलायन्स (RIL) आणि बँकिंग शेअर्समधील तेजीनेही बाजाराला सपोर्ट मिळाला. रियल्टी, ऑईल आणि गॅस, ऑटो प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्याने वाढले.
IT शेअर्स तेजीत
सेन्सेक्सवर टीसीएसचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ३.७० टक्क्यांनी वाढून ३,५२५ रुपयांवर पोहोचला. तर टेक महिंद्राचा शेअर ३.३३ टक्के वाढीसह १,२१२ रुपयांवर गेला. एचसीएल टेक ३ टक्क्यांनी वाढून १,३१४ रुपयांवर आणि इन्फोसिसचा शेअर २.८१ टक्के वाढून १,४५० रुपयांवर पोहोचला. एम अँड एम, एनटीपीसी, विप्रो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टायटन, टाटा मोटर्स, टायटन, सन फार्मा, टाटा स्टील हे शेअर्स १ ते २.५० टक्क्यांपर्यंत वाढले. तर पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक या शेअर्समध्ये घसरण झाली.
निफ्टीवर हेरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि इन्फोसिस हे तेजीत राहिले. तर ॲक्सिस बँक, कोल इंडिया, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस यांचे नुकसान झाले.
बायबॅक ऑफरमुळे टीसीएसचा शेअर टॉप गेनर
भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सीने शेअर्स बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २५ नोव्हेंबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. गेल्या ६ वर्षात कंपनीने पाचव्यांदा बायबॅक ऑफर आणली आहे. याआधी जानेवारी २०२२ मध्ये टीसीएसने १८ कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक केले होते. यावेळी त्यांची १७ हजार कोटींचे शेअर बायबॅक करण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर आज टीसीचा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढून ३,५२५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. याआधी बीएसईवर हा शेअर ३,३९९ रुपयांवर बंद झाला होता. शेअर्समधील तेजीमुळे बीएसईवर कंपनीचे बाजार भांडवल १२.८९ लाख कोटी रुपये झाले आहे.
यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीचे सत्र थांबवणार असल्याच्या शक्यतेने बाजाराला मदत झाली. कारण आयटी कंपन्या अमेरिकेतून त्यांच्या महसुलातील महत्त्वपूर्ण वाटा मिळवतात.
ऑईल आणि गॅस स्टॉक्स वधारले
दरम्यान, पीएसयू बँक आणि मेटल स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. अधिक पुरवठा आणि कमी मागणीमुळे ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल ८० डॉलरपर्यंत खाली आल्यानंतर ऑईल आणि गॅस स्टॉक्स वधारले. तेलाच्या किमतीतील घसरण भारतासारख्या आयातदारांसाठी आणि त्याच्या तेल विपणन कंपन्यांसाठी सकारात्मक बाब आहे. निफ्टी ५० वरील गेनर्समध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा समावेश होता.
जागतिक बाजारातील स्थिती
अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक बुधवारी किरकोळ वाढून बंद झाले होते. पण आशियाई बाजारांनी गती घेण्यासाठी गुरुवारी संघर्ष करावा लागला. एमएससीआय एशिया एक्स-जपान निर्देशांक ०.७ टक्क्यांनी घसरला. याआधीच्या सत्रात हा निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक वाढला होता. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.२८ टक्क्यांनी घसरला. चीनचा सीएसआय ३०० निर्देशांक (CSI 300 Index) आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांकातही घसरण दिसून आली.
परदेशी गुंतवणूकदार खरेदीकडे वळले
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) १५ सत्रांतील विक्रीचा सिलसिला बुधवारी थांबवला. त्यांनी ५५० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गंत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २० व्या सत्रातही खरेदी सुरु ठेवली. त्यांनी बुधवारी ६१० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
The post IT स्टॉक्सच्या जोरावर बाजाराची घौडदौड, बायबॅक ऑफरमुळे TCS चा शेअर टॉप गेनर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांमुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार हिरव्या चिन्हात बंद झाला. सुरुवातीच्या किरकोळ घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने आज गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात जोरदार रिकव्हरी केली. आजच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे ६५० अंकांनी वाढून ६६,३२४ वर पोहोचला. तर निफ्टीने १९,८४६ वर व्यवहार केला. त्यानंतर ही तेजी कमी होऊन सेन्सेक्स ३०६ अंकांच्या वाढीसह ६५,९८२ वर …

The post IT स्टॉक्सच्या जोरावर बाजाराची घौडदौड, बायबॅक ऑफरमुळे TCS चा शेअर टॉप गेनर appeared first on पुढारी.

Go to Source