लवंगी मिरची : दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा

लवंगी मिरची : दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा

काय म्हणताय मंडळी, छान चालू आहे ना दिवाळी? भरपूर फराळ, थोडेसे फटाके आणि ऊर्जा देणार्‍या भेटीगाठी हे सगळे सांभाळून सुरू आहे ना? निवांत चालू द्या. दिवाळी हा सण म्हणजे आपल्यासाठी घेऊन येतो अंधाराला दूर सारणारा प्रकाश. आपल्या मनातली सगळी नकारात्मकता लक्ष लक्ष दिव्यांच्या उजेडामुळे दूर सारली जाते आणि वर्षभर पुरेल इतका उत्साह आणि ऊर्जा दिवाळी आपल्याला देऊन जाते. व्हॉटस्अपवर मेसेज पाठवले असतीलच ना असंख्य लोकांना? तुमचा फोन येईल अशी अपेक्षा नसणार्‍या दुरावलेल्या एखाद्या मित्राला फोन करा ना यार. काही बिघडत नाही. कमकुवत झालेला मैत्रीचा धागा तुमच्या एका फोनमुळे मजबूत दोरखंडामध्ये बदलला जात असेल तर सगळा अहंकार बाजूला ठेवून एखादा तरी फोन केला पाहिजे. एखादी मैत्रीण असते.
आपण तिच्याकडील कार्याला जाऊ शकलो नाही म्हणून नाराज झालेली असते. दिवाळी तुम्हाला संधी देत आहे असे दुरावलेले संबंध पुन्हा जोडण्याची. त्या मैत्रिणीला एक फोन करून टाका. ‘अगं दिवाळीच्या शुभेच्छा. काय कसं काय चाललंय? सूनबाई गेली की नाही दिवाळसणाला?’ एवढी दोनच वाक्ये पुरेशी आहेत. त्यानंतर ती मैत्रीण जे उत्साहाने बोलायला सुरुवात करेल ते पंधरा-वीस मिनिटे शांततेने ऐकून घ्या ना. बघा, पुन्हा एकदा मैत्रीचा दुवा सांधला जातो की नाही ते? जेवढे पूल आपण बांधत जाऊ, तेवढे आपल्यासाठी चांगले आहे. खूप काहीतरी स्वतःबद्दल गैरसमज करून घेऊन त्याप्रमाणे संबंध ठेवत राहाल तर एकटे पडत जाल.
काही लोकांना आपल्या श्रीमंतीचा तोरा असतो. त्यामुळे ते लोकांशी बोलताना माझे घर, माझा बंगला, माझ्या परदेश वार्‍या, माझ्या गाड्या याशिवाय दुसरे काही बोलत नसतात. मग असे लोक आपल्यापेक्षा कमी ऐपत असणार्‍या लोकांशी फारसे बोलत नाहीत. समजा, आम्हाला कोणी त्याच्या श्रीमंतीचा तोरा दाखवला तर आमचा एकच प्रश्न असतो की, बाबा रे… तू असशील खूप श्रीमंत; पण मी तुला एक रुपया तरी कधी मागितला का? तुझ्या श्रीमंतीचा जर मला काहीच फायदा नसेल तर तू इथे ती का दाखवत आहेस? तुझी श्रीमंती तुझी तुलाच लखलाभ होवो.
जगात सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर माणसाचा माणसाशी असणारा संवाद. ‘नैराश्य येत आहे, चला बोलूया’ ही तर जागतिक आरोग्य संघटनेची थीमच आहे. याचे कारण असे की, डिप्रेशन हे जगभरात सर्वत्र वाढीला लागले आहे. अगदी आपल्या देशातसुद्धा असंख्य लोक डिप्रेशनमध्ये आहेत. हे डिप्रेशन दूर करण्यासाठी दिवाळीसारखी संधी नाही. सहज म्हणून शुभेच्छांचा फोन करण्याची संधी दिवाळी तुम्हाला देते. ही संधी व्हॉटस्अप मेसेजने पूर्णत्वाला जात नाही.
आभाळामध्ये हात पोहोचलेले असले तरी जमिनीवर आपली मुळे घट्ट रोवून उभी राहणारी असंख्य माणसे या समाजात आजूबाजूला असतात आणि ती सातत्याने इतरांचे जीवन उजळून टाकण्यासाठी प्रयत्न करत असतात. खरे तर ही माणसे नव्हेत तर प्रकाशाची बेटे आहेत. असे एखादे बेट आपल्या संपर्कात आले तर आपण ते सांभाळले पाहिजे, जपून ठेवले पाहिजे. याचे कारण म्हणजे जेवढी अशी प्रकाशाची बेटे समाजात वाढतील तेवढा हा समाज निरोगी मानसिकतेचा आणि आनंदी असणार आहे. या दिवाळीपासून पुढे आनंद देणे आणि आनंद घेणे हे ईश्वराने आपल्याला दिलेले काम आपण निष्ठापूर्वक करत राहू, असा संकल्प करूया. बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि पुढे येणार्‍या भाऊबीजेच्या आमच्या सर्व वाचकांना लक्ष लक्ष शुभेच्छा. अंगणभर पसरणार्‍या उजेडासारख्या आभाळभर शुभेच्छा.
The post लवंगी मिरची : दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा appeared first on पुढारी.

काय म्हणताय मंडळी, छान चालू आहे ना दिवाळी? भरपूर फराळ, थोडेसे फटाके आणि ऊर्जा देणार्‍या भेटीगाठी हे सगळे सांभाळून सुरू आहे ना? निवांत चालू द्या. दिवाळी हा सण म्हणजे आपल्यासाठी घेऊन येतो अंधाराला दूर सारणारा प्रकाश. आपल्या मनातली सगळी नकारात्मकता लक्ष लक्ष दिव्यांच्या उजेडामुळे दूर सारली जाते आणि वर्षभर पुरेल इतका उत्साह आणि ऊर्जा दिवाळी …

The post लवंगी मिरची : दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा appeared first on पुढारी.

Go to Source