पुणे : नव्या पिढीने गूळ, हळदही बनविली ब्रॅंडेड

पुणे : नव्या पिढीने गूळ, हळदही बनविली ब्रॅंडेड

शंकर कवडे

पुणे : शर्ट असो वा बूट, तो ब्रॅंडेड असला की त्याला आताच्या जमान्यात पसंती दिली जाते अन् चांगली किंमतही. या ब्रॅंडेड वस्तूंच्या दुनियेत आता खाद्यपदार्थांनीही प्रवेश केला असून, साध्या गूळ, मिरची पूड, साबुदाण्यापासून ते अगदी काजू-बदाम-पिस्तासारख्या सुकामेव्यापर्यंतच्या वस्तूही आकर्षक वेष्टनात, एका विशिष्ट ब्रॅंडेडचे नाव धारण करून आपल्यासमोर येत आहेत. यातले अनेक ब्रॅंडेड खाद्यपदार्थ अगदी आपल्याच शहरातील व्यापारी तयार करताहेत. आतापर्यंत बारदाण म्हणजे पोत्यांत किलो-शेराचे माप घालून पोहे-डाळी देणार्‍या व्यापार्‍यांची नवी पिढी गुळगुळीत पॅकिंगमधून तोच, पण योग्य प्रतवारी केलेला माल विकू लागली असून, त्यायोगाने अनोखा स्टार्टअपच आकार घेतो आहे.
शेतकरी काही वर्षांपूर्वी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत होते तेव्हा तो 100 ते 110 किलोच्या पोत्यांमध्ये येत होता. त्या वेळी, माल निवडला जात नसे. तसेच, त्याची प्रतवारीही होत नव्हती. त्यामुळे सर्वच मालाला ’सब घोडे बाराटक्के’ न्यायाने एकच एक भाव मिळत असे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे काळ बदलला. त्यात विक्रीबाबतचे नियमही बदलल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात पारंपरिक बाजारही बदलला. परिणामी, या मालाची दर्जानुसार प्रतवारी करण्यास सुरुवात झाली.
व्यापार्‍यांच्या नव्या पिढीने आता एक पाऊल टाकले आहे आणि या प्रतवारी केलेल्या मालाला स्वत:चे ब्रॅंड नेम देण्यास सुरुवात केली आहे. काजू-पिस्तासारखा माल सुट्या पद्धतीने खरेदी करून मार्केट यार्डात आणला जातो. त्यातील सर्वांत चांगला माल बाजूला काढून आकर्षक, गुळगुळीत रंगीत प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरला जातो आणि तो मॉलमध्ये विकल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांच्या ब्रॅंडच्या स्पर्धेत उतरून विकण्यात येतो.
गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गूळ-भुसार बाजारात राज्य, देश, तसेच परदेशातूनही माल दाखल होतो. शहरातील एकमेव घाऊक बाजार असलेल्या या बाजारात पूर्वी 100 किलोपासून 110 किलोपर्यंत माल येत होता. एकत्रित कुटुंबपध्दतीमुळे खरेदीही त्याप्रमाणात खरेदीही होत होती. मात्र, मागील काही वर्षांत अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे प्रतवारीपासून पॅकिंगपर्यंत सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत.
त्यात, विभक्त कुटुंबपध्दती वाढीस लागल्याने बाजारात पूर्वी होणारी मागणी आत्ता पावशेर व किलोवर येऊन पोहोचली आहे.बाजारात विविध कंपन्यांनीही ग्राहकांच्या गरजेनुसार माल पुरविणे सुरू केल्याने मार्केट यार्डातील व्यापार्‍यांसाठी ती स्पर्धा ठरत असल्याने व्यापारीवर्गानेही त्यादृष्टीने पाऊल ठेवले आहे. मिरची वगळता बहुतांश अन्नधान्य सध्या ब्रॅंड म्हणून पुढे लॉन्च करण्यात येत आहे.
ब्रॅंडला महत्त्व
व्यापारात मग तो कोणताही असो, त्यात ब्रॅंड हा परवलीचा शब्द झाला आहे. यामुळे आकर्षक पॅकिंग, गुणवत्ता, रास्त दर आणि ग्राहकांना मालाची खात्री याकडे सर्व व्यापारी जातीने लक्ष देत आहेत. त्याअनुषंगाने अनेक जणांनी आपले स्वतःचे ब्रॅंड निर्माण केले आहेत. मार्केट यार्डात पूर्वीच्या काळी घाऊक विक्रेते थेट शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात माल घेत असत. या वस्तूंना कोणताही ब्रॅंड नव्हता. ते आपला माल किरकोळ विक्रेते आणि वितरकांना ब्रॅंडशिवाय विकत असत. बदलत्या काळानुसार आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेमुळे मार्केट यार्डातील भुसार माल व्यापारात लक्षणीय बदल होत आहे.
गुणवत्तेला प्राधान्य
ब्रॅंड हा संस्थेला, व्यापाराला एक महत्त्वाची ओळख देतो. ग्राहकांना खरेदी करण्यास प्रोत्साहित करतो. वितरण आणि जाहिरातींना समर्थन देतो. ब्रॅंड हा व्यापाराला गुणवत्तेसह एक जबाबदारी प्रधान करतो. याचे महत्त्व आता मार्केट यार्डातील व्यापार्‍यांना समजले आहे. या महत्त्वपूर्ण अशा बदलामुळे मार्केट यार्डातील भुसार मालाची गुणवत्ता वाढली आहे. आता अनेक व्यापारी गुणवत्तेकडे विशेष लक्ष देत आहेत. ब्रॅंडमुळे मालाच्या स्वच्छता मानकांमध्येमध्ये विशेष बदल जाणवत आहे.
पूर्वी शंभर किलो आता एक किलो
बदलत्या काळानुसार व्यापारामध्ये बदल करून घेणे व त्यानुसार व्यापक कृती करणे व्यापारी वर्गासाठी गरजेचे झाले होते. ग्राहकांची आवड ओळखून त्यानुसार आपल्याला पॅकिंगमध्ये बदल करण्यात आले. मागील 25 ते 30 वर्षांपूर्वी मार्केट यार्डात 100 किलो पॅकिंग व्यापार चालत होता. त्यानंतर तो 50 किलोंवर आला. सध्याच्या घडीला तो 30 किलोपासून 5 किलो, 1 किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध झाला आहे.
तरुण अडत्यांना निर्यातीचे वेध
पूर्वी, नॉन-ब्रॅंडेड वस्तू गुणवत्तेकडे पुरेसे लक्ष दिले जात नव्हते. मालाची बाजारपेठ मर्यादित असल्याने ब्रॅंडची आवश्यकता भासत नव्हती. मात्र, आता ऑनलाइन व्यापारामुळे बाजारात स्पर्धा निर्माण झाली असून, व्यवसायाचा विस्तार झाला आहे. त्यामुळे पारंपरिक व्यापार्‍यांनी कंबर कसली असून, नव्या पिढीने स्वतःचे ब—ँड तयार करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यांत्रिकीकरणाचा आणि तंत्रज्ञान याचा योग्य मेळ घालून व्यापारी आपल्या मालाचे ब्रॅंडिंग करीत आहेत.
या वस्तूंचे होते स्थानिक ब्रॅंडिंग
गूळ, मिरची पूड, धने पूड, काजू, बदाम, मनुके, पिस्ता, अंजीर, हळद, साबुदाणा, भगर, वरई, पोहे, डाळी आदी.
सॉफ्टवेअर्समुळे काम सोपे
बिलाचे पैसे वसूल करण्यासाठी यापूर्वी व्यापार्‍यांना ग्राहक, किरकोळ विक्रेते आणि वितरकांना कॉल करायला लागे, परंतु यांत्रिकीकरणामुळे हे काम स्वयंचलित सॉफ्टवेअर्समुळे सोपे आणि सुव्यवस्थित झाले आहे. ग्राहकांकडून त्यांचा प्रतिसाद आणि मालाबाबतची मते मिळविण्यासाठी, त्यांच्याशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होण्यासाठी अशी सॉफ्टवेअर्स उपयोगी पडतात. त्यामुळे ग्राहकांची संपूर्ण माहिती म्हणजेच डेटा बेस मिळतो आणि त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते. बाजारात येणारा प्रत्येक ब्रॅंड स्वत:ची एक वेबसाइट तयार करत आहे. पुण्याबाहेरच्या ग्राहकांपर्यंतही त्यामुळे पोहोचता येते.

मार्केट यार्डमध्ये एक महत्त्वपूर्ण असे परिवर्तन होत आहे. मार्केट यार्डातील होलसेल व्यापार हा आता नॉन-ब्रॅंडेड व्यवहाराकडून ब्रॅंडेडकडे वेगाने वाटचाल करीत आहे. अनेक व्यापारी आपला नावलौकिक म्हणजेच गुडविल वापरून स्वत:चे ब्रॅंड निर्माण करीत आहेत आणि मालाची गुणवत्ता सुनिश्चित करीत आहेत. दर्जेदार, गुणत्तापूर्ण, स्वच्छ, आकर्षक पॅकिंगमध्ये आपल्या मालाचे वितरण करीत आहेत. हा अनुभव ग्राहकांना सुखावणारा ठरत असून, व्यापार्‍यांचा आत्मविश्वास वाढवीत आहे.
– आशिष दुगड, संचालक, दि पूना मर्चंट्स चेंबर.

हेही वाचा
धक्कादायक! धुमाळवाडीत बापाकडून मुलाची निर्घृण हत्या
धक्कादायक! धुमाळवाडीत बापाकडून मुलाची निर्घृण हत्या
सांगलीत स्‍वाभिमानीचे आंदोलन पेटले; कारखान्याकडे जाणारी शंभरावर ऊसाची वाहने रोखली
The post पुणे : नव्या पिढीने गूळ, हळदही बनविली ब्रॅंडेड appeared first on पुढारी.

पुणे : शर्ट असो वा बूट, तो ब्रॅंडेड असला की त्याला आताच्या जमान्यात पसंती दिली जाते अन् चांगली किंमतही. या ब्रॅंडेड वस्तूंच्या दुनियेत आता खाद्यपदार्थांनीही प्रवेश केला असून, साध्या गूळ, मिरची पूड, साबुदाण्यापासून ते अगदी काजू-बदाम-पिस्तासारख्या सुकामेव्यापर्यंतच्या वस्तूही आकर्षक वेष्टनात, एका विशिष्ट ब्रॅंडेडचे नाव धारण करून आपल्यासमोर येत आहेत. यातले अनेक ब्रॅंडेड खाद्यपदार्थ अगदी आपल्याच …

The post पुणे : नव्या पिढीने गूळ, हळदही बनविली ब्रॅंडेड appeared first on पुढारी.

Go to Source