वैद्यनाथाच्या अभिषेकावर बंदी; २०० पुरोहितांच्या उपजीविकेवर गदा!

वैद्यनाथाच्या अभिषेकावर बंदी; २०० पुरोहितांच्या उपजीविकेवर गदा!

परळी वैजनाथ; Bharat Live News Media वृत्तसेवा : बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात पिढ्यानपिढ्या पौरोहित्य करून उपजीविका भागवणाऱ्या सुमारे 200 कुटुंबावर विश्वस्त मंडळाच्या मनमानी कारभाराने गदा आली आहे. देवस्थान कमिटीच्या या निर्णयानंतर प्रचंड गदारोळ उठला आहे. भाविकांतून या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ब्राह्मण, जंगम, गुरव, पुरोहीत आक्रमक झाले असून याबाबत मुकमोर्चा काढून तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
परळीचे वैद्यनाथ देवस्थान कमिटीचे विश्वस्त मंडळ आपल्या मनमानी कारभारासाठी प्रसिद्ध आहे. केवळ काही विश्वस्त स्वतःच्या हट्टापायी अनेक चुकीचे निर्णय लादत असतात. प्रभु वैद्यनाथाला दिवसभरात भाविकांकडून होणाऱ्या अभिषेकालाही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अभिषेक पावत्या देणग्यांच्या माध्यमातून येणाऱ्या मंदिरच्या उत्पन्नालाही खीळ घालण्याचा हा प्रकार आहे.
प्रभू वैद्यनाथाच्या अभिषेकांनाच मर्यादित करुन एकप्रकारे बंदी घालण्याचा तुघलकी निर्णय देवल कमिटीने घेतला आहे. अभिषेकाच्या मर्यादितच पावत्या देणे, अभिषेकाला अपुरी वेळ, पुरोहितांना व अभिषेक करणाऱ्या भाविकांना कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसणे, येता-जाता पुरोहितांची मानहानी करणे आदी असंख्य प्रकार विश्वस्त मंडळाकडून केले जातात.
मर्यादित अभिषेक व अपुरी वेळ, त्याचबरोबर कमीतकमी अभिषेक व्हावेत, अशी अनेक बंधंने घालण्यात आली आहेत. त्यामुळे पिढ्यानपिढ्या मंदिरातील पूजा अर्चना करून उदरनिर्वाह करणाऱ्या परळीतील जवळपास 200 कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. याबाबत मंदिरातील पुरोहितांनी वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांना आज मागण्यांचे निवेदन दिले. या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा, अन्यथा वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर सहकुटुंब उपोषण करण्याचा इशारा  पुरोहितांनी दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने पुरोहीतवर्ग उपस्थित होता.
भाविकांतून तीव्र प्रतिक्रिया
केवळ काही विश्वस्त स्वतःच्या हट्टापायी अनेक चुकीचे निर्णय लादत असतात. ना भाविकांचा विचार, ना मंदिरचा विचार, ना मंदिरचा लौकिक वाढविण्याचा विचार अशा पद्धतीचा कारभार वर्षांनुवर्ष परळीकर अनुभवत आहेत. मात्र आता याचा कडेलोट झाला असून आता तर साक्षात प्रभू वैद्यनाथाच्या अभिषेकांनाच मर्यादित करुन एकप्रकारे बंदी घालण्याचा तुघलकी निर्णय देवल कमिटीने घेतला आहे अशा तीव्र प्रतिक्रिया भाविकांतून व्यक्त होत आहेत.

लेकराबाळांसह वैद्यनाथाच्या दारात उपोषण करणार
दरम्यान प्रभू वैद्यनाथ मंदिरात वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पौरोहित्य करून आपली उपजीविका भागवणाऱ्या सुमारे 200 कुटुंबावर विश्वस्त मंडळाच्या मनमानी कारभाराने गदा आली आहे. काही विश्वस्तांमुळे आमच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे न्यायासाठी आम्ही सर्व ब्राह्मण, जंगम व अन्य पुरोहीत मंडळी लेकरा बाळांसह वैद्यनाथाच्या दारात उपोषण करणार आहोत.
– शिरीषगुरु राजुरकर, पुरोहीत, वैद्यनाथ मंदिर
वैद्यनाथ मंदिर ही काही विश्वस्तांची मालकी नाही.केवळ ब्राह्मण द्वेषापोटी अशाप्रकारची खेळी केली जात आहे.देवल कमिटीने घालून दिलेल्या नियमांनुसार व रितसर पावती घेऊन प्रत्येक पुरोहीत इथे काम करतो मात्र त्याला चार पैसेही मिळो नये व पुरोहीत मंदिरात टिकूच नये अशा अडचणी मुद्दाम निर्माण केल्या जाता. आम्हाला न्याय द्यावा.
– पारगांवकरगुरु, पुरोहीत, वैद्यनाथ मंदिर