संपत्तीच्या हव्यासापोटी अधिकारी सुनेने दिली सासऱ्याची सुपारी!
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुलगा डॉक्टर, सून अधिकारी असे सुखवस्तू कुटुंब असूनही पैशाच्या हव्यासापोटी कोणी काय करेल सांगता येत नाही. नुकत्याच झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकांच्या भीषण अपघात प्रकरणी सुपारी किलिंगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता ही सुपारी चक्क सुनेनेच देत हिट अॅड रनचा प्रकार घडवून आणल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी नगररचना विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अर्चना मनीष पुट्टेवार (वय ५३) यांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
गेल्या महिन्यात ८० वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. पोलीस तपासात मात्र तो अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. पुरुषोत्तम हे त्यांची मुलगी व नातवाच्या नावे संपत्ती करणार असल्याने सुनेनेच त्यांची जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी नीरज ईश्वर निमजे (वय ३०, रा. शक्ती माता नगर, खरबी रोड) आणि सचिन मोहन धार्मिक (वय २९) या दोघांना अटक करून त्यांचा पीसीआर घेतला आहे. दोघांच्या मोबाईलचे सीडीआर तपासले असता अर्चना ही घटनेच्या दिवशी दोघांच्या संपर्कात होती. दोघांनी अर्चनाचे नाव सांगितल्याने पोलिसांनी तिला अटक करण्यात आली. आता अर्चनाने किती रुपयांमध्ये ही सुपारी दिली हे चौकशीत स्पष्ट होणार आहे.
२२ मे रोजी सकाळी पुरुषोत्तम हे बालाजी नगर मधून दीनदयाल ग्रंथालयासमोरून चालत जात असताना सचिन हा दुचाकीने पुरुषोत्तम यांचा पाठलाग करीत होता. त्याने लगेच निरज, सार्थकला सांगितले. नीरजने भरधाव कार पुरुषोत्तम यांच्या अंगावर घातली. घटनेनंतर तिघेही पसार झाले. पुरुषोत्तम यांना मानकापूरमधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले होते. अजनी पोलिसांनी सुरुवातीला अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, नंतर सीसीटीव्हीच्या आधारे नीरजला अटक केली. नातेवाईकांनी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर हा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला. गुन्हे शाखेच्या चौकशीत हा सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचे समोर आले. या घातपातासाठी एक कारही ऑटोडील दुकानातून सार्थक, सचिन व निरजणे घेतली. यासाठी आर्थिक मदतही झाल्याची माहिती पुढे आली.
हेही वाचा :
जवानांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक
दारूच्या नशेत बायकोला अपशब्द, मित्राचा खून