दक्षिणेत भाजपचा काँग्रेसला शह ! लोकसभेच्या निकालातून स्पष्ट

दक्षिणेत भाजपचा काँग्रेसला शह ! लोकसभेच्या निकालातून स्पष्ट

काँग्रेसला 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यामध्ये मोठी घट; आमदार सतेज पाटील यांच्यासाठी सूचक इशारा; आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपमध्ये काटाजोड लढतीचे संकेत

कृष्णात चौगले कोल्हापूर

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील हे 42 हजार 709 मतांनी विजयी झाले होते. पण गेल्या पाच वर्षात हे मताधिक्य कायम ठेवण्यामध्ये आमदार ऋतुराज पाटील आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील अपयशी ठरल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांना ‘दक्षिण’ मधून मोठे मताधिक्य अपेक्षित होते. पण महाराजांना ‘दक्षिण‘ मधून केवळ 6 हजार 579 इतकी आघाडी मिळाली. हे घटलेले मताधिक्य पाहता दक्षिणमध्ये भाजप म्हणजेच महाडिक गटाने काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना अप्रत्यक्षपणे शह दिला असून आगामी विधानसभा निवडणुकीत काटाजोड लढतीचे संकेत आहेत.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ म्हणजे जिह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू. याच मतदारसंघाच्या राजकारणातून 2009 पासून पाटील-महाडिक राजकीय संघर्षास सुरुवात झाली. या संघर्षामुळे आजतागायत जिह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विधानसभा निवडणुकीमध्येही टोकाची इर्ष्या पहावयास मिळाली. यामध्ये सतेज पाटील यांचे पुतणे काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी बाजी मारुन 2019 मध्ये दक्षिणेत रुजलेले कमळ अखेर उखडले. यावेळी माजी आमदार अमल महाडिक यांच्या पराभवामुळे महाडिक गटासह भाजपला मोठा धक्का बसला होता.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मदतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिह्यात भाजपची पाळेमुळे रोवली. महाडिकांची राजकीय रणनिती आणि समर्थ साथ यामुळेच अनेक सत्ताकेंद्रे ताब्यात घेण्यासाठी भाजप यशस्वी ठरले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमल महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचा पराभव करून दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचा झेंडा रोवला होता. याचवेळी सतेज पाटील यांचे राजकारण संपले अशी चर्चाही काही दिवस सुरु होती. पण त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा पराभव करून उट्टे काढले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘आमचं ठरलयं‘ असा नारा देत तत्कालिन शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांची सर्व राजकीय सुत्रे आपल्याकडे घेऊन माजी खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ऋतुराज पाटील व अमल महाडिक यांच्यात लढत झाली असली तरी सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असाच सामना रंगला होता. त्यानंतर झालेल्या गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीमध्येही आमदार पाटील यांनी महाडिक यांची संघातील अनेक वर्षाची सत्ता संपुष्टात आणली.
‘दक्षिण’ विजयासाठी पाटील-महाडिक भिडणार
लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती यांना 1 लाख 56 हजार इतक्या मताधिक्यांनी विजयी करण्यामध्ये आमदार सतेज पाटील यांची रणनिती यशस्वी ठरली आहे. करवीर, राधानगरी विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे हा विजय सुकर झाला असला तरी त्या तुलनेत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिणमध्ये शाहू महाराजांना निर्णायक आघाडी मिळू शकली नाही. 326 मतदान केंद्रापैकी 154 मतदान केंद्रावर महाराजांना मताधिक्य मिळाले आहे. शाहू छत्रपतींना 1 लाख 23 हजार 873 मतदान तर 1 लाख 17 हजार 171 मतदान प्रा. संजय मंडलिकांना मिळाले आहे. फुलेवाडी, सानेगुरूजी, नाना पाटील नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, संभाजीनगर, राजारामपुरी, शाहूपुरी, जरगनगर, कळंबा, पाचगांव, उजळाईवाडी, उचगांव, गांधीनगर, गोकुळ शिरगांव या केंद्रांमध्ये मंडलिक यांनी आघाडी घेतली आहे. तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजणार असल्यामुळे सतेज पाटील गटासाठी ही चिंतेची बाब असून त्यांना डॉमेज कंट्रोल करावे लागणार आहे. या उलट लोकसभेतील विरोधकांचे 6 हजाराचे मताधिक्य कसे कमी करून आघाडी कशी घ्यायची यासाठी महाडिक गटाकडून प्रयत्न केला जाणार आहे.