अंतराळात गूढ रेडिओ सिग्नलमुळे खगोल शास्त्रज्ञांसमोर नवे आव्हान

अंतराळात गूढ रेडिओ सिग्नलमुळे खगोल शास्त्रज्ञांसमोर नवे आव्हान

वॉशिंग्टन : अंतराळातून येणार्‍या एका गूढ रेडिओ सिग्नलने जगभरातील खगोलशास्त्रज्ञांसमोर नवे आव्हान निर्माण केले आहे. या गूढ रेडिओ सिग्नलची यापूर्वी एकदाही नोंद झालेली नाही. त्यामुळे त्याची अधिक चर्चा सुरू आहे. ‘द कॉन्व्हर्सेशन डॉट कॉम’ने याबाबत अलीकडेच एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालातील माहिती उत्सुकता वाढवणारी आहे आणि त्याचवेळी भीतीही निर्माण करणारी आहे.
या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, अलीकडेच खगोलशास्त्रज्ञ अशा रेडिओ सिग्नलपर्यंत पोहोचले आहेत, जे त्यांनी याआधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेलेही नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते, हे गूढ रेडिओ सिग्नल खूप आश्चर्यकारक आहे. या मधूनमधून येणार्‍या आवाजाचे संपूर्ण चक्र सुमारे एक तासाभराच्या कालावधीचे आहे आणि यापूर्वी हे सिग्नल कधीही ऐकण्यात आलेले नाहीत.
अहवालात या विचित्र आवाजांबद्दल अधिक माहिती देताना सांगण्यात आले आहे, की कधी कधी हा आवाज लांबलचक ट्यूनसारखा असतो, तर कधी त्याच्या तीव्रतेत अचानक वाढ होते. कधी हा आवाज अतिशय कर्कश असतो, तर कधी तो अगदी कमकुवत तरंग निर्माण करतो. काही वेळा आवाजाच्या या चक्रात निरव शांततादेखील पसरते.
अंतराळवीरांचे असेही म्हणणे आहे की, नेमके काय घडत आहे याबाबत स्पष्टपणे काही सांगता येणार नाही. हा एक असामान्य न्यूट्रॉन तारादेखील असू शकतो. शिवाय, इतर शक्यतादेखील नाकारता येणार नाहीत. काही काळापूर्वी, ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईटच्या मदतीने, नासाच्या आंतरराष्ट्रीय पथकाने पृथ्वीपासून सुमारे 40 प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका नवीन ग्रहाचा शोध लावला होता. त्याचा आकार आणि वातावरण पृथ्वीसारखेच आहे. आतापर्यंत शोधलेल्या कोणत्याही राहण्यायोग्य एक्सोप्लॅनेटपैकी हा ग्रह पृथ्वीशी सर्वांत जास्त साधर्म्य दाखवणारा आहे. रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मासिक जर्नलमध्ये याबाबत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर, या गूढ रेडिओ सिग्नलमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.