आफ्रिकेतील भारतीयांचा ‘हा’ पदार्थ भारतातच नाही मिळत!

आफ्रिकेतील भारतीयांचा ‘हा’ पदार्थ भारतातच नाही मिळत!

जोहान्सबर्ग : आपल्या देशातून वेगवेगळ्या कारणांसाठी काही लोक अन्य देशांमध्ये स्थलांतरित झालेले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवरच्या डरबन शहरात मोठ्या संख्येने भारतीय राहतात. आणि त्यांच्या संस्कृतीचा एक भाग बनलेली‘बनी चाओ’ नावाची एक डिश इथं मिळते. पण, कमाल म्हणजे ही डिश भारतातच मिळत नाही. अनेक वर्षांपूर्र्वी बरेच भारतीय आफ्रिकेत उसाच्या मळ्यात काम करायला स्थलांतरित झाले होते. त्यांच्यासोबतच ‘बनी चाओ’ तिथं गेला, पण भारतात याबद्दल कुणालाही कल्पना नाही.
बनी चाओ म्हणजे करी भरलेला ब्रेडचा तुकडा. ‘बनी चाओ’ भारतात मिळणार नाही याचे कारण ती बनवण्याची पद्धतच खास दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांची आहे. लोक याला ‘बनी चाओ’ म्हणत असले, तरी यात सशाचं मांस नसतं. हा पदार्थ मटणापासून बनवतात. ब्रेडच्या वाडग्यातच ही करी होते. म्हणून ‘बनी चाओ’ खायला सुटसुटीत असतं. ‘बनी चाओ’बरोबर गाजराचं सॅलड देतात. यामुळंच डरबनमधील शेतमजुरांमध्ये आणि कामगारांमध्ये ‘बनी चाओ’ स्ट्रीट फूड म्हणून लोकप्रिय आहे.
‘बनी चाओ’ कसं खायचं, हे ज्याच्या-त्याच्या मर्जीवर अवलंबून असतं. याला चमचा वापरून देखील खाता येतं, असंही काही लोक म्हणतात. बनी चाओ हातानं खाल्ल्यास ब्रेडमधली करी पूर्णपणे खाता येते. पण, चमचा वापरून खायचा प्रयत्न केल्यास करी पूर्णपणे खाता येत नाही, असे जाणकार सांगतात. ‘बनी चाओ’ डरबनमधला भारतीयांचा पारंपरिक खाद्यपदार्थ आहे; पण भारतात मात्र तो मिळत नाही!