टीम इंडिया बाजीगर..! टी-20 विश्वचषकात पाकिस्तानवर सातवा विजय

टीम इंडिया बाजीगर..! टी-20 विश्वचषकात पाकिस्तानवर सातवा विजय

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : हारी बाजी को जितना जिसे आता है…. उसे टिम इंडिया कहते है.. 120 धावांचे टार्गेट असूनही पाकिस्तानाला त्यांनी चारी मुंड्या चित केलेे. टी-20 वर्ल्डकपमध्ये न्यूयॉर्कच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करीत 119 धावांचे रक्षण केले आणि पाकिस्तानला 6 धावांनी हरवले. ऋषभ पंत (42), जसप्रीत बुमराह (3 विकेट) हे भारतीय विजयाचे हीरो ठरले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताला 19 षटकांत 119 धावांत गुंडाळले. यावेळी भारत हा सामना हरणार असेच चित्र सर्वत्र होते. परंतु त्यांच्या फलंदाजांना हे आव्हान पेलले नाही. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. कर्णधाराने कल्पक डावपेच रचले, आणि क्षेत्ररक्षकांन ते यशस्वी केले. या सांघिक कामगिरीच्या जोरावर अमेरिकेच्या मैदानात भारताचा विजयाचा झेंडा फडकला.
टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात हा भारताचा पाकिस्तानवर मिळवलेला हा सातवा विजय ठरला. आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यात पाकिस्तान फक्त एकदा जिंकला आहे.
नासाऊ स्टेडियमवर भारताने दिलेल्या 120 धावांचे टार्गेट चेस करण्यासाठी मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम ही पाकिस्तानची सलामी जोडी मैदानात उतरली. भारतीय गोलंदाजांपुढे तेही संघर्ष करताना दिसले, परंतु त्यांच्या सुदैवाने त्यांनी विकेट गमावली नाही. भारताला पहिले यश पाचव्या षटकांत बुमराहने मिळवून दिले. त्याने बाबरला (13) बाद केले.
पाकिस्तानला 11व्या षटकात 57 धावांवर दुसरा धक्का बसला. अक्षर पटेलने उस्मान खानला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 13 धावा करता आल्या. पाकिस्तानला 73 धावांवर तिसरा धक्का बसला. हार्दिक पांड्याने फखर जमानला यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. त्याला 13 धावा करता आल्या,
भारताला विकेटची नितांत गरज असताना बुमराह धावून आला. त्याने मोहम्मद रिझवानचा त्रिफळा उडवला. त्याने 31 धावा केल्या. पाकची चौथी विकेट 80 धावांवर पडली. या विकेटने पाकिस्तानवर दबाव वाढला. अक्षर पटेलने पुढच्या षटकांत फक्त 3 धावा देवून हा दबाव वाढवला. पुढच्या षटकांत हार्दिक पंड्याने शादाबची (4) मोठी विकेट मिळवून दिली. या षटकांत 5 धावा गेल्या. पाकिस्तानला शेवटच्या 18 चेंडूत 30 धावा हव्या होत्या. सिराजच्या 18 व्या षटकांत 9 धावा आल्या. 19 वे षटक टाकण्यास बुमराह आला. बुमराचे हे षटक गेम चेंजर ठरले. या षटकात इफ्तिकारची विकेट मिळवत बुमराहने फक्त 3 धावा दिल्या.
शेवटच्या षटकांत 18 धावांचे रक्षण करण्याची जबाबदारी अर्शदिपवर होती. त्याने पहिल्या चेेंडूवर जम बसलेल्या इमाद वासिमला (15) बाद केले. ऋषभने हा अफलातून झेल घेतला. नसीम शहाच्या बॅटमधून दोन चौकार आले परंतु शेवटी भारताने 6 धावांनी विजय मिळवला. पाकच्या 20 षटकात 7 बाद 113 धावा झाल्या.
तत्पूवी, पावसामुळे नाणेफेक उशिरा झाली. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला; पण त्यानंतरही पाऊस आला. पावसाळी वातावरण आणि समोर पाकिस्तानचा वेगवान मारा यामुळे भारतीय फलंदाजीची कसोटी लागणार होती. रोहित शर्माने पहिल्या षटकात षटकार खेचून भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
पहिले षटक पूर्ण झाल्यानंतर पाऊस सुरू झाला आणि सर्व खेळाडूंना पुन्हा डगआऊटमध्ये जावे लागले. 9.15 वाजता पावसाने विश्रांती घेतली. पावसानंतर खेळ सुरू झाला; पण विराट कोहलीचा अपयशाचा पाढा सलग दुसर्‍या सामन्यात कायम राहिला आणि टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात विराट (4) प्रथमच सलग दोन सामन्यांत एकेरी धावेवर माघारी परतला. त्यापाठोपाठ शाहिन आफ्रिदीने सापळा रचून तशाच चेंडूवर रोहितला झेलबाद केले. रोहितने 13 धावा केल्या. भारताचे दोन्ही सलामीवीर 2.4 षटकांत 19 धावांवर माघारी परतले.
चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलने (20) दम दाखवला आणि ऋषभसह 39 धावा जोडल्या. नसीमने त्याला बाद केले. हा दिवस ऋषभचा होता आणि त्याचे 3 झेल सुटले. त्याचा फायदा उचलताना त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना चोप दिला.
ऋषभने 10 व्या षटकात हॅरिस रौफला सलग तीन चौकार खेचून संघाला 3 बाद 81 धावांपर्यंत पोहोचवले. ऋषभला रोखणे पाकिस्तानसाठी अवघड होऊन बसले. कारण, तो त्याचे आडवेतिडवे शॉटस् अगदी सहजतेने खेळून धावांचा पाऊस पाडत होता; पण सूर्यकुमार यादव (7) रौफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शिवम दुबेला (3) फलंदाजीची संधी मिळाली. परंतु, नसीम शाहने संथ चेंडूवर त्याला कॉट अँड बोल्ड केले. मोहम्मद आमीरने 15 व्या षटकातच भारतीयांना हादरवून सोडले. आमीरच्या गोलंदाजीवर ऋषभने आक्रमक फटका खेचला. परंतु, यावेळी त्याचा झेल गेला. ऋषभ 31 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 42 धावांवर माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर रवींद्र जडेजा शॉर्ट मिड ऑफला इमाद वासीमला सोपा झेल देऊन परतला.
भारताची अवस्था 7 बाद 97 अशी झाली होती. अर्शदीपने आमीरची हॅट्ट्रिक रोखली. नसीम शाहने 4-0-21-3 असा अप्रतिम स्पेल टाकला. हार्दिक पंड्याकडून (7) अखेरच्या षटकांत खूप अपेक्षा होत्या. परंतु, इफ्तिखार अहमदने भन्नाट झेल घेतला. हॅरिस रौफने सलग दुसर्‍या चेंडूवर जसप्रीत बुमराहला भोपळ्यावर माघारी पाठवले. अर्शदीप (9) शेवटी धावचित झाला. भारत 19 षटकांत 119 धावांवर ऑल आऊट झाला. रौफने 21 धावांत 3 विकेटस् घेतल्या.
‘रीलिज इम्रान खान’
रविवारी न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटीमध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यादरम्यान एक विमान मैदानावर ‘रीलिज इम्रान खान’ बॅनर घेऊन उडताना दिसले. पहिल्या षटकानंतर हलक्या पावसामुळे खेळ थांबला होता, तेव्हा हा प्रकार घडला. ‘एएनआय’ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.