नारळात कुठून येते पाणी?

नारळात कुठून येते पाणी?

नवी दिल्ली : नारळपाणी हे आरोग्यदायी पेय आहे आणि अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता तर पूर्ण होतेच; पण त्यात असलेले इलेक्ट्रोलाइटस् आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच त्यात कमी फॅटस् असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही नारळपाणी चांगले मानले जाते. पण, हे तर नारळाचे पाणी पिण्याचे फायदे झाले, जे नारळ बाहेरून इतकं कडक असतं की मुंगी शिरायलाही जागा नसते. अशा नारळामधील पाणी नेमकं येतं कुठून, याचा विचार कधी केलाय का? माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. जाणून घ्या…
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो. डिहायड्रेशनमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात हायड्रेशनची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळपाणी हा एक चांगला पर्याय आहे. जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असलेले नारळाचे पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते. त्यात अँटी-ऑक्सिडंटस्ही भरपूर असतात. अर्थात, नारळपाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण, आरोग्याच्या गुणधर्मांनी भरलेले हे पाणी नारळाच्या आत कुठून येते, याची अनेकांना माहिती नसते. नारळाची झाडे खूप उंचावर वाढतात.
नारळ हे बाहेरून कठीण आणि सर्व बाजूंनी बंद असते. अशा स्थितीत पाणी कुठून येते, हा प्रश्न अनेकांना पडतो. आपण जे नारळाच्या आतील पाणी पितो ते खरं तर वनस्पतीच्या एंडोस्पर्मचा भाग आहे. नारळाचे झाड पाणी गोळा करण्यासाठी किंवा राखून ठेवण्यासाठी आपल्या फळांचा वापर करते. त्यामुळे नारळाच्या झाडाचे पाणी हे त्याच्या फळात साठवण्याचा एक मार्ग म्हटला तरी चालेल. झाडाच्या मुळांद्वारे हे पाणी गोळा करून फळांपर्यंत पोहोचवले जाते. मुळं आणि फळांच्या पेशींद्वारे हे पाणी फळांच्या आत येते. यानंतर, जसजसे हे नारळ पिकू लागते, एंडोस्पर्म पाण्यात विरघळू लागतात आणि पाणी हळूहळू सुकते.
जेव्हा नारळ सुकतो, तेव्हा आपण खातो ते म्हणजे नारळाची चव किंवा खोबरं. हे या एंडोस्पर्मचे घन स्वरूप असते. ही संपूर्ण प्रक्रिया नारळाच्या झाडाच्या पेशींद्वारे होते. जर सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर एंडोस्पर्म प्रथम द्रव स्वरूपात असते. हे रंगहीन द्रव नारळाचे पाणी असते आणि नंतर पेशींसह ते नारळाच्या आतल्या बाजूने जमा होऊ लागते. हळूहळू ते नारळातील खोबर्‍यामध्ये बदलते. झाडाच्या विकासादरम्यान, फर्टिलाईजेशननंतर एंडोस्पर्मचे रूपांतरण नंतर न्यूक्लियसमध्ये बदलते.