मृत्यूपूर्वीचा तीन मित्र-मैत्रिणींचा शेवटचा व्हिडीओ!

मृत्यूपूर्वीचा तीन मित्र-मैत्रिणींचा शेवटचा व्हिडीओ!

रोम : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पुराच्या पाण्यात तीन मित्र-मैत्रिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूपूर्वीचा हा शेवटचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी या मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं. पण, दुर्दैवाने तिघंही पाण्यात वाहून गेले. घटनास्थळावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये मृत्यूचा हा लाईव्ह थरार कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तीनही मित्र-मैत्रिणी एका ठिकाणी नदीच्या मधोमध अडकले होते. त्यामध्ये एक जोडपे व त्यांच्या मैत्रिणीचा समावेश आहे.
ही घटना इटलीमधील आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार पॅट्रिजिया कॉर्मोस (20 वर्ष), तिची मैत्रीण बियांका डोरोस आणि तिचा बॉयफ्रेंड क्रिस्टिटन मोलनार अशी मृतांची नावं आहेत. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार हे तिघंही घटनास्थळी फिरायला आले होते आणि नदीत पोहायला उतरले. पण, नदीचं पाणी अचानक वाढल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही. पाणी वाढल्यानंतर बचावासाठी त्यांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं; पण पाण्याच्या जोरदार प्रवाहात तिघंही वाहून गेलं. काही अंतरावरच दोघांचे मृतदेह आढळले.
हे मृतदेह पॅट्रिजिया कॉर्मोस आणि बियांका डोरोस यांचे होते. तर क्रिस्टिटन मोलनारचा अद्याप शोध घेतला जात आहे. हे तिघंजण पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या काही पर्यटकांपैकी एकाने तत्काळ अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण, वाचवण्यापूर्वीच हे तिघं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अग्निशमन दलाचे प्रमुख जॉर्जिया बासिले यांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे दोरखंड फेकण्यात आला. पण, नदीचं पाणी वाढलं आणि आमच्या डोळ्यासमोर तिघेही पाण्यात वाहून गेली, असं जॉर्जिया यांनी सांगितलं.