धनकवडी परिसरात पावसाने हाहाकार; पावसाळापूर्व कामे अपूर्ण असल्याने नागरिकांचे हाल

धनकवडी परिसरात पावसाने हाहाकार; पावसाळापूर्व कामे अपूर्ण असल्याने नागरिकांचे हाल

धनकवडी : Bharat Live News Media वृत्तसेवा : धनकवडी, दत्तनगर परिसरात मान्सूनपूर्व कोसळलेल्या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे अक्षरशः पितळच उघडे पडले असून, पावसाळापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मंगळवारी दुपारनंतर धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव बुद्रुक-पठार परिसरामध्ये जोरदार वादळी वार्‍यासह झालेल्या तुफान पावसाने हाहाकार उडाला. ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने जागोजागी मोठी झाडे उन्मळून पडली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रस्ता समसमांतर नसल्याने भारती विद्यापीठ गेटमागील परिसरातील रस्त्यांवर दोन्ही बाजूंना गुडघाभर पाणी साठून राहिलेले होते. त्यामुळे याच साठलेल्या पाण्यातून वाट काढताना स्थानिक नागरिकांची चांगलीच दमछाक झाली. पावसाच्या पाण्यामुळे मुख्य रस्त्यावरील सांडपाणी वाहिन्यांचे चेंबरचे मेन होल ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावर पाणी वाहत होते.
भारती विद्यापीठमागील भागात कश्मीर मैत्री चौकातील विद्यापीठ पोलिस चौकीच्या बाजूला पाण्याचा अक्षरशः डोहच झाला होता. त्याचप्रमाणे इच्छापूर्ती गणेश मंदिरालगत, राजमुद्रा सोसायटीत, आंबेगाव पठार परिसरातदेखील असंख्य झाडे उन्मळून पडलेली दिसून आली होती. आंबेगाव पठार परिसरातील झाडे विजेच्या वाहिनींवर पडल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे परिसरातील असंख्य सोसायटीच्या भागात पाच ते सहा तास वीज गायब झाली होती.
भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकाकडून शिवशंकर चौक ते राऊत बाग ओढ्यातील पावसाळी वाहिनीचे काम करताना कमी व्यासाच्या वाहिन्या चिखल, मातीने भरून गेल्यामुळे बंदिस्त गटारात दगड, गोटे, कचरा भरून गेल्याने चेंबर उघडे पडले आणि परिणामी पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागल्याने येथील बहुतांश रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत होते.
सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी
पावसाने दहा ते बारा घरांत आणि येथील प्रतिभानगर सोसायटी, साईनगरीसह इतर सोसायट्यांतील दहा ते बारा घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी घुसले. नागरिकांचे संसार साहित्य, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू भिजून मोठे नुकसान झाले. जवळपास चार फुटांपेक्षा अधिक पाणी रस्त्यावर साठले होते. त्यामुळेच पाच ते सहा कार पाण्यात बुडाल्या होत्या. याच ठिकाणावरून चार ते पाच दुचाकी काही फूट अंतरापर्यंत वाहून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मान्सूनपूर्व पावसाचे पाणी सतत नागरिकांच्या घरात घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पावसाळी कामाचा दर्जा तपासण्याची गरज
बाणेर, औंध, पाषाण परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांची चांगलीच परीक्षा घेतली. तर पालिका प्रशासनाने पावसाळी कामे बर्‍यापैकी पूर्ण केल्याचा दावा केला असून, प्रत्यक्षात पावसाळी कामाचा दर्जा तपासण्याची गरज असल्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
औंध, बाणेर, पाषाण परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विधाते वस्ती परिसर, फोल्लोड फार्म रस्ता, ताम्हाणे चौक, अलोमा काउंटी, ज्युपीटर हॉस्पिटल, बाणेर मुख्य रस्ता, बाणेर-पाषाण रोड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहावयास मिळाले. यामुळे अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडीही झालेली होती. बर्‍याच ठिकाणी पावसाळी कामे झाली नाहीत. गुडघ्याएवढे पाणी साचल्याने नागरिकांना वाहने कसरत करत चालवावी लागत होती. याबाबत पावसाळापूर्व कामे पूर्ण झाली असल्याचा दावा कनिष्ठ अभियंता पराग सावरकर यांनी केला.
माणिकबागेत रस्त्यावर चार ते पाच फूट पावसाचे पाणी
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबागेत ब्रह्म हॉटेल समोरील वीर तानाजी मित्रमंडळाकडे जाणार्‍या अंतर्गत रस्त्यावर मंगळवारी रात्री पावसाच्या पाण्याचा मोठा लोंढा येऊन भलेमोठे पाण्याचे तळेच झाले होते. हे पावसाचे पाणी, गाळ व माती येथील रस्त्याच्या कडेला असणार्‍या दुकानांत, इमारतीत व घरांमध्ये घुसले होते. यामुळे दुकानदार व नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. त्यातच ड्रेनेजचे चेंबर तुंबल्यामुळे घाण मैलापाणी रस्त्यावर आले.
मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे माणिकबागेत चार ते पाच फूट पाणी रस्त्यावर साठले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी व जेसीबीच्या साहाय्याने हे पाणी व रस्त्यावर आलेला गाळ बाहेर काढण्यात आला. यामुळे येथील नागरिकांचे व दुकानदारांचे मोठे नुकसान झाले व त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा 

सलग दुसर्‍या दिवशीही पाऊस; 11 जूनपर्यंत राहणार अवकाळीचा जोर
नरेंद्र मोदींच्‍या शपथविधी सोहळ्याचे ‘या’ राष्‍ट्र प्रमुखांना मिळणार निमंत्रण
कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर कारवाई; बेकायदा बांधकाम जमीनदोस्त