नीलेश लंके : शिफारसपत्राविना नोकरी गमावलेल्या युवकाची संसदेपर्यंत भरारी

नीलेश लंके : शिफारसपत्राविना नोकरी गमावलेल्या युवकाची संसदेपर्यंत भरारी

दीपक रोकडे

नगर : मतमोजणीच्या सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेल्या विखेंपुढे आता नीलेश लंके यांचा टिकाव लागणार नाही, असे वाटत असताना लहान लहान आकड्यांची आघाडी घेत लंकेंनी लाखालाखांचे आकडे सोशल मीडियावरील व्हायरल ‘फेक’ आकडे नेस्तनाबूत केले. त्या पार्श्वभूमीवर कमी आघाडीने का होईना विजयी झालेल्या लंके यांना ‘बाजीगर’ असे संबोधले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ‘हार के जितनेवाले को बाजीगर कहते है!’ आमदारकीच्या निवडणुकीतही जायंट किलर ठरलेले लंके तेव्हाही हारतीलच असेच जाहीररित्या बोलले जात होते. तो इतिहासही ताजाच आहे. त्या पार्श्वभूमीवर कोण आणि कसे आहेत नगरचे नवे खासदार.. एक दृष्टिक्षेप…
विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच आमदार विजय औटी यांच्याशी थेट पंगा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत शक्तिप्रदर्शन करणारे नीलेश लंके सार्‍यांनाच आठवतात. औटींच्या आडून लंके यांनी ठाकरे यांच्याशीच पंगा घेतल्याची आवई उठवत विरोधकांनी लंके यांच्यावर ‘बाण’ सोडले. अर्थातच ज्यासाठी लढा दिला, ते साध्य न झाल्याचे शल्य घेऊन घायाळ न होता शिवसेनेच्या अंगणमातून लंकेंनी काढता पाय घेतला. लौकिकार्थाने हा त्यांचा पराभवच होता. पण लढाई खरी तिथूनच सुरू होणार होती. लंकेंची विजिगुषू वृत्ती ओळखून शरद पवार यांनी पाठीवर हात ठेवला आणि बघता बघता लंके यांनी मैदान मारले. शिवसेनेच्या अंतर्गत कलहात हारलेली लढाई विधानसभेच्या मोठ्या मैदानात लढून ते ‘जायंट किलर’ ठरले. हार के जितनेवाले को बाजीगर कहते है.
आमदार विजय औटींचा पराभव करून लंके बाजीगर ठरले होते… त्यानंतरचा गेल्या साडेचार वर्षांतील इतिहास सार्‍यांना ठाऊक आहे.
आमदार झाल्यानंतर तोरा मिरवण्याची संधीही लंके यांना मिळाली नाही. लगेच कोविड आला. लंके यांचा कामाचा धडाका सुरू झाला आणि ते कोविड योद्धा म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कोविड सेंटरमध्ये विक्रमी 33 हजार 500 लोकांवर यशस्वी उपचार झाले. रुग्णांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे ते आजही देशात प्रसिद्ध आहेत. या समाजकारणाच्या जोरावर लंकेंचे राजकारणही बहरात आले. लोकसभा निवडणुकीतही विखे यांचा पराभव करून ते पुन्हा ‘जायंट किलर’ ठरले. मतमोजणीवेळी प्रत्यक्षात तिसरी-चौथी फेरी सुरू असतानाच ‘विखे अमुक हजार मतांनी आघाडीवर’ अशा ‘फेक’ पोस्ट व्हायरल होत होत्या.
खरे म्हणजे सातव्या फेरीपर्यंत विखे खरोखर आघाडीवर होतेच आणि लंके हारणारच, अशा वल्गनाही सुरू झाल्या होत्या. त्यातच इकडे सोशल मीडियात विखेंच्या आघाडीने हजारोंचे इमले बांधले होते. मात्र आठव्या फेरीपासून लंकेंनी आघाडी घेतली आणि आस्तेकदम विजयाला गवसणी घातली. ही बाजीही त्यांनी जणू हारता हारता जिंकली… लंके इथेही बाजीगर ठरले! 10 मार्च 1980 रोजी जन्मलेल्या लंके यांना तरुणपणी आमदाराचे शिफारसपत्र न मिळाल्याने नोकरी मिळाली नाही. अनेक व्यवसाय केले. अयशस्वी ठरले. मग सामाजिक उपक्रम सुरू केले. अनेक जण प्रभावित झाले आणि त्यांच्याशी जोडले गेले. आमदार होण्यापूर्वी ते फक्त ग्रामपंचायत सदस्य म्हणून एकदा निवडून आले होते.
कोविड काळातील कार्याने ख्याती मिळविल्यानंतर त्यांनी सामुदायिक विवाह सोहळे, कृषी प्रदर्शन, तीर्थयात्रा, पोलिस भरतीसाठी व्हर्चुअल अकादमी आणि ‘खाकी’ अ‍ॅप, डिजिटल शाळा, स्वयंरोजगार साहित्याचे वाटप, महिला सक्षमीकरण, मोफत रुग्णवाहिका सेवा, मुलांचे पालकत्व आदी कार्यक्रम घेतले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, शैक्षणिक साहित्यवाटप, पगारातून ट्रायसायकल, मोटर ट्रायसायकल वाटप व विद्यार्थी व रुग्णांना आपल्या पगारातूनच आर्थिक मदत देऊ लागले. मार्च 2023 मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सात हजार सहाशे सायकलींचे वाटप केले. महिलांसाठी आध्यात्मिक सहलीचा त्यांचा उपक्रम तर प्रसिद्धच आहे. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘वर्ड रेकॉर्ड युनियन’तर्फे आंतरराष्ट्रीय ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2022’ ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन- 2021’, ‘महाराष्ट्र कोविड योद्धा-2021’ या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. जानेवारी 2024 मध्ये पॅरिसच्या (फ्रान्स) ‘द थेम्स इंटरनॅशनल युनिवर्सिटी’कडून त्यांना ’म ानद डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली आहे.
हेही वाचा

धानोरी, वडगाव शेरी परिसराला पावसाने झोडपले; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ८ जूनला?