loksabha election 2024 result : सुळे, मोहोळ, बारणे, कोल्हे विजयी

loksabha election 2024 result : सुळे, मोहोळ, बारणे, कोल्हे विजयी

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार मतदारसंघांपैकी पुण्याची जागा भारतीय जनता पक्षाच्या मुरलीधर मोहोळ यांनी तर सर्वाधिक अटीतटीची बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी खेचून घेतली. काका- पुतण्याच्या युद्धात अनुभवाच्या बळावर काकांनी बाजी मारली. त्याच पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरमधून तर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून आपली जागा राखण्यात यश मिळवले. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्याने जिल्ह्यातील जागांचे वाटप ‘फिफ्टी-फिफ्टी’ प्रमाणात झाले आहे.
पुण्यात मोहोळ यांच्यासमोर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मोठे आव्हान उभे केले होते.
मात्र, मोहोळ यांनी एक लाख 23 हजार 38 या मताधिक्याने धंगेकर यांच्यावर मात केली. मोहोळ यांना पाच लाख 84 हजार 728 मते, तर धंगेकर यांना चार लाख 61 हजार 690 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांना 32 हजार 12 मतांवरच समाधान मानावे लागले. मोहोळ यांना त्यांच्या हक्काच्या कोथरूड तसेच वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघाची भक्कम साथ मिळालीच, पण त्याचबरोबर त्यांना धंगेकर निवडून आलेल्या आणि मूळचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातूनही प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आव्हान देत त्यांचे पुतणे अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. पवार यांच्या कन्या असलेल्या बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजितदादांनी आपल्या पत्नी सुनेत्रा यांनाच रणांगणात उतरवल्याने बारामती कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, सुप्रिया सुळे यांनी एक लाख 58 हजार नऊचे मताधिक्य मिळवत त्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी रात्री 12 वाजता अखेरच्या 24व्या फेरीनंतर निकाल जाहीर केला. सुळे यांना 7 7 लाख 31 हजार 400, तर सुनेत्रा पवार यांना 5लाख 73 हजार 391 मते मिळाली. सुळे यांना काही अपवाद वगळता मतदारसंघाच्या सर्वच भागांतून मताधिक्य मिळत गेल्याचे स्पष्ट झाले.
शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघातील माजी खासदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचे जबरदस्त आव्हान लीलया परतवले. यांत्रिक बिघाडाने मतमोजणी लांबल्याने रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. कोल्हे यांना सहा लाख 98 हजार 692 तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाच लाख 57 हजार 741 मते मिळाली. कोल्हेंनी 1 लाख 40 हजार 951 मताधिक्याने विजय मिळविला. कोल्हे यांना शिरूर, जुन्नर, खेड-आळंदी या भागांनी भरभक्कम साथ दिली तर आढळराव यांना हडपसर, भोसरी आणि आंबेगावमधून प्रतिसाद मिळत गेला, मात्र कोल्हे यांना मिळणारे मताधिक्य विजयाकडे नेणारे ठरले.
मावळात लोकसभेची निवडणूक प्रथमच लढवणार्‍या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजोग वाघेरे यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी 96 हजार 615 मताधिक्याने पराभव केला. बारणे यांना 6 लाख 91 हजार 832 मते तर वाघिरे यांना 5 लाख 96 हजार 217 मते मिळाली. या लढतीत मतमोजणीच्या एकूण 25 फेर्‍या झाल्या. त्यातल्या केवळ दोन फेर्‍यांमध्येच वाघेरे यांनी मताधिक्य मिळवले, तर उरलेल्या सर्व फेर्‍यांमध्ये बारणे यांनी अधिक्य घेतल्याने शेवटी त्यांनी बाजी मारली.
विद्यमानांनी चारही गढ्या राखल्या
पुणे जिल्ह्यातील चारही जागा विद्यमानांनी राखल्याचे स्पष्ट झाले. बारामतीतून सुप्रिया सुळे, मावळातून श्रीरंग बारणे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे हे तिघे गेल्या निवडणुकीतही याच मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र दोघांच्या पक्षांच्या नावात बदल झाला आहे. तिघा विद्यमान खासदारांनी गढी राखली तर चौथी पुण्याची जागा भाजपने आपल्याकडे राखली. खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या त्या जागी भाजपचेच मोहोळ निवडून आल्याने एका अर्थाने पुण्यातील चारही गढ्या विद्यमानांनीच राखल्या आहेत.
शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीमुळे त्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव मिळाल्याने सुळे आता त्या पक्षाच्या खासदार असतील. तसाच प्रकार डॉ. कोल्हे यांच्याबाबत झाला आहे. दुसरीकडे गेल्या 2019 च्या निवडणुकीत मावळ मतदारसंघातून एकसंध शिवसेनेकडून निवडून आलेल्या श्रीरंग बारणे यांच्या पक्षाचे नाव पक्षफुटीनंतरही शिवसेना असेच राहिले आहे.
हेही वाचा

Lok sabha Election 2024 Results : अकोला: भाजपचे अनुप धोत्रे विजयी; अभय पाटील, प्रकाश आंबेडकरांचा पराभव
Lok sabha Election 2024 Results : : कोकणात महायुतीला पाच, तर मविआला एक जागा
Lok sabha Election 2024 Results : मराठवाड्यात भाजपला धक्का: दानवे, जानकर, चिखलीकर, शृंगारे यांचा पराभव