लाेकसभा निवडणूक निकालानंतर शेअर बाजाराची दिशा काय असेल?

लाेकसभा निवडणूक निकालानंतर शेअर बाजाराची दिशा काय असेल?

प्रदीप गुडसुरकर, शेअर बाजार अभ्यासक

शेअर बाजारामध्ये 4 जूननंतर तेजीचे वातावरण राहील की मंदीचे वातावरण राहील, यासंदर्भामध्ये गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांच्या मनामध्ये अनेक तर्क आणि वितर्क निर्माण झालेले आहेत. बाजार खर्‍या अर्थाने कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहे, या संदर्भामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यापूर्वी 3 जून म्हणजेच सोमवारी शेअर बाजारामध्ये तेजी आणि मंदीचे दडपण मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.
निवडणूक निकालाचे प्रतिबिंब शेअर बाजारात उमटते
निवडणुकीचा कल कसा राहील? कोणत्या पक्षास किती जागा मिळतील, या संदर्भामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळा अंदाज ठरलेला असेल. त्याचे प्रतिबिंब शेअर बाजारामध्ये दिसत असते. सध्याचा विचार करता निफ्टी हा 22,500 च्या पातळीवर आहे. 4 जूनला भाजप आणि मित्र पक्ष यांचे संख्याबळ किती असेल, यावर तेजी किंवा मंदीचे आवर्तन अवलंबून आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करू शकत असेल, तर शेअर बाजाराला एक वेगळ्या प्रकारचा व चांगला संदेश मिळू शकेल, अशा आशयाचा विचार शेअर बाजारामध्ये रूढ होऊ शकतो. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाच वर्षांचा इतिहास पाहिला असता आपणास असे लक्षात येते की, निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी बाजारामध्ये मंदीचे वातावरण राहिले. गेल्या आठवड्यातही तशा प्रकारचे संकेत दिसले; पण शुक्रवारी बाजारात तेजी दिसून आली.
मागील काही आठवड्यामध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदार व ट्रेडर इत्यादी वर्गाने नफा वसुली केली आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ लिक्विडिटी अर्थात तरलता मोठ्या प्रमाणावर आहे. ही मंडळी कोणत्या सेटरमधील शेअर्सची खरेदी-विक्री करायची, याचा निर्णय आपापल्या तर्कानुसार किंवा अंदाजाने घेत असतात. बाजाराचा एकंदरीत सूर पाहता पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात कायमस्वरूपी तेजी असण्याची शक्यता आहे. अशी तेजी दीर्घकालीन असेल. म्हणूनच दीर्घकालाचा विचार करता बाजारामध्ये ऊर्जा, रेल्वे, रस्ते, वाहतूक, सिमेंट, स्टील इत्यादी क्षेत्रांमध्ये दीर्घकाळासाठी तेजी असेल.
अल्पकाळाचा विचार करता ट्रेडर्सच्या मानसिकतेचा द़ृष्टिकोन लक्षात घेऊन कोणता पक्ष सत्तेवर येईल? त्या पक्षाच्या लॉबीचे शेअर्स कोणते, कोणत्या कंपन्या याच्या शोधामध्ये ते सदैव असतील या सर्व घटकांचा विचार करता एनएचपीसी, एलआयसी, सेल, युनियन बँक, एनटीपीसी, एचपी, इंडियन ऑईल यासारख्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समधून त्यांना नफा मिळवता येऊ शकेल. वास्तविक पाहता शेअर्सची खरेदी -विक्री करीत असताना अल्पकाळासाठी मंदी आली, तरी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडून घेतले जाणारे आर्थिक निर्णय, त्यांची अमलबजावणी आणि त्यामध्ये असणारा आत्मविश्वास याचे प्रतिबिंब शेअर बाजारामध्ये दिसू शकेल. अशी अंदाजित माहिती अनुभवी असणारे गुंतवणूकदार, ट्रेडर्स आणि वित्तीय संस्था यांना असते. त्याचा ते फायदा उठवत असतात.
निकालावर ठरेल शेअर बाजाराचा आत्मविश्वास
सध्याचा विचार करता राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला काठावरचे बहुमत मिळाले किंवा कमी जागा मिळाल्यास नक्की निफ्टी 21,500 च्या दरम्यान अडखळत वाटचाल करू शकतो. भाजप आणि मित्रपक्ष मिळून कसेबसे सरकार बनविणार असतील, तर शेअर बाजारामधील असणारा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कारण, स्थिर व भक्कम सरकार नसल्यास आर्थिक स्वरूपामध्ये होणारे निर्णय योग्य पद्धतीने होतील का, अशी शंका गुंतवणूकदारांच्या मनामध्ये येते. त्यामुळे शेअर बाजार हा मंदीकडे झुकण्याची शक्यता आहे. यानुसार निफ्टीचा प्रवास 22 हजारांकडून 21 हजारांच्या दिशेने होऊ शकतो.
याउलट भाजप व मित्र पक्षांना 300 ते 325 च्या जागा मिळाल्यास निफ्टी 22,500 ते 23,000 यांच्या मध्ये घुटमळू शकतो. कारण, यामुळे सरकारच्या अस्थिरतेचा मुद्दा निकाली निघेल. रालोआला 325-330 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाल्यास निफ्टी 23,500 च्या पुढे तेजीने आगेकूच करू शकतो. हा जनतेच्या मनामधील किंवा काही व्यक्तींच्या मनामध्ये असणारा आकड्यांचा खेळ आहे. प्रत्यक्ष बाजाराची वाटचाल कशी राहील, जागतिक पातळीवरून काही मोठे सकारात्मक वा नकारात्मक संकेत येतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एक गोष्ट निश्चित आहे की, दीर्घकाळाचा विचार करता एकपक्षीय किंवा भक्कम बहुमत असणारे सरकार स्थापन झाल्यास बाजारातील आत्मविश्वास वाढणार आहे.