आमदार रेवण्णा यांना न्यायालयाची नोटीस

आमदार रेवण्णा यांना न्यायालयाची नोटीस

बंगळूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणात जामिनावर असलेले आमदार एच. डी. रेवण्णा यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावून पुन्हा पाच दिवसांच्या आत पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. होळेनरसीपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अजय यांनी रविवारी (दि. 2) हरदनहल्ली येथील रेवण्णा यांच्या घरी जाऊन उच्च न्यायालयाची नोटीस बजावली आहे. एसआयटीने रेवण्णा यांच्या जामिनाला आव्हान देत उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यामुळे न्यायालयाने आता रेवण्णा यांना सुनावणीला उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे.
केआरपेट, म्हैसूरमध्ये दाखल झालेल्या पीडित महिलेच्या अपहरणाच्या प्रकरणात एच. डी. रेवण्णा यांना एसआयटीने अटक केली होती; मात्र, रेवण्णा यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, आता एसआयटीच्या अधिकार्‍यांनी रेवण्णा यांच्या जामिनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रेवण्णा पुन्हा अडचणीत सापडले आहेत. महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी रेवण्णा यांची पत्नी भवानी रेवण्णा यांचा जामीन अर्ज लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटी अधिकार्‍यांनी भवानी रेवण्णाला अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुलाबरोबरच रेवण्णा पती-पत्नीलाही चौकशीच्या फेर्‍याला सामोरे जावे लागणार आहे.